पुण्यश्लोक राजमातांच्या जयंतीनिमित्त गोदा पूजनाचा दिव्य महोत्सव

नाशिक । पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशत जयंतीनिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित गोदा पूजन व महाआरतीचा पवित्र सोहळा श्रद्धा, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरेचा संगम ठरला. हा सोहळा राजमातांच्या तेजस्वी कार्यास अर्पण करण्यात आला असून, नाशिककरांच्या मनामनांत अभिमानाचे भाव जागवणारा क्षण ठरला.

सायंकाळी ६:३० वाजता रामतीर्थ घाटावर गोदामातेचे विधिवत पूजन होळकर घराण्याचे वंशज राजमान्य श्रीमंत युवराज यशवंतराजे होळकर (तृतीय) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यांच्या समवेत श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे मामा – श्री अमरजीतसिंह बारगळ मामा यांचीही उपस्थिती लाभल्याने परंपरेच्या स्मरणाचा सात्त्विक ठसा या सोहळ्यावर उमटला.

संत सेवा संघाचे अध्यक्ष पूज्य संजय गुरुजी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सन्मान शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि पगडी देऊन करण्यात आला. युवराज यशवंतराजेंना विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी युवक सेवकांनी “राष्ट्रासाठी क्षणोक्षणी कार्य करण्याचा” संकल्प घेत देशभक्तीचा उत्स्फूर्त संदेश दिला.

कार्यक्रमाच्या आयोजनात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी, उपाध्यक्ष नृसिंह कृपादास, सचिव मुकुंद खोचे, कोषाध्यक्ष सौ. अशिमा केला, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फड, प्रफुल्ल संचेती, आरती प्रमुख चैतन्य गायधनी, स्वागत समितीचे अध्यक्ष श्रीनिवास लोया, तसेच रामेश्वर मालाणी, नरेंद्र कुलकर्णी, दिलीप दादा दीक्षित यांचा मोलाचा सहभाग होता.

धनंजय बेळे, शिवाजीराव बोंदार्डे, वैभव क्षेमकल्याणी, रंजितसिंग आनंद, अमोल गायकवाड, दत्ता मिसाळ, अनुलोम विभाग प्रमुख, आणि शहरातील धनगर समाजातील ज्येष्ठ मान्यवर देखील या दिव्य सोहळ्यास साक्षीदार ठरले. कार्यक्रमात चैतन्य गायधनी, अक्षय शेरताटे, शुभम पाटील, हितेश चंदवाणी, तुषार गुरुम, वेदिका अंभोरे, आकांक्षा नांद्रे, वरदा जोशी आणि सायली पाठक या युवा कार्यकर्त्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.

रामतीर्थ घाटावर यावेळी निर्माण झालेला भक्तिभाव आणि ऐतिहासिक वातावरणाने केवळ घाट नव्हे, तर नाशिकचे आभाळही उजळून गेले. राजमातांच्या स्मृतीस अर्पण झालेला हा सोहळा एक आगळावेगळं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्य ठरला.

error: Content is protected !!