कृषीमंत्री कोकाटेंनी केली सिन्नर बस स्थानकाची पाहणी

नाशिक । सिन्नर शहरात 25 मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे सिन्नर बसस्थानकाच्या गॅलरीचा स्लॅब कोसळून स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसचे नुकसान झाले होते. आज कृषीमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर बस स्थानकास भेट देऊन पाहणी केली.

दोन दिवसांपूर्वी सिन्नरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब प्लॅट फॉर्म ६ वर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर कोसळला. तसेच बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या एका कारचेही मोठे नुकसान झाले.

सदरच्या बस स्थानकाचे काम हे सिन्नरचे आमदार राज्याचे कृषीमंत्री असलेले अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्या भावाकडे सोपविण्यात आले होते. त्यामुळे यावरून आता राजकारण तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कामाच्या निकृष्ठतेवर ठपका ठेवत कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, ना. कोकाटे यांनी सिन्नर येथे बस स्थानकाची पाहणी केली. यावेळी समवेत मुंबईचे महाव्यवस्थापक स्थापत्य दिनेश महाजन, विभाग नियंत्रक श्रावण सोनवणे, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, कल्याणी ढगे, आगर व्यवस्थापक हेमंत नेरकर, विभागीय स्थापत्य अधिकारी चैताली भुसारे, स्थानक प्रमुख सुरेश पवार आदी उपस्थित होते.

बस स्थानकाच्या नुकसान झालेल्या भागाचे नवीन बांधकाम करण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक सादर करावे. तसेच बस स्थानकाच्या छतावर पावसाचे पाणी साठणार नाही यादृष्टीने पाण्याचा निचरा होण्यासाठी जास्तीत जास्त आउटलेटचा अंदाजपत्रकात समावेश करावा, अशा सूचना कृषीमंत्री कोकाटे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या.

error: Content is protected !!