मुंबई-अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर प्रवाश्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. प्रवाश्यांची चूक नसताना विनाकारण त्यांना जीव गमवावा लागला. अपघातानंतर सरकार तसेच टाटा ग्रुपने मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु विमान अपघातात मदतीचे काय निकष असतात, प्रत्यक्षात मृतांच्या कुटुंबियांना किती मदत मिळते? कोण मदत देते? काय असतात निकष? हे आपण जाणून घेऊया…
देशांतर्गत विमानांसाठी विमान वाहतूक मंत्रालय नियम ठरवते. २०१४ मध्ये हवाई वाहतूक मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार विमान अपघात झाल्यास विमान कंपन्या प्रवाश्यांच्या कुटुंबियांना २० लाख रुपये भरपाई देण्यास जबाबदार असतात. मात्र आंतरराष्ट्रीय विमानांसाठी निकष वेगळे असून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानाचा अपघात झाल्यास १.४ कोटी रुपये भरपाई दिली जाते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सदस्य देशांच्या कर्जासाठी १९६९ मध्ये या निधीची सुरुवात केली. सदस्य देश एकमेकांच्या चलनातील कर्ज एसडीआरच्या बदल्यात नाणेनिधीकडून घेऊ शकतात. एसडीआर म्हणजे अमेरिकेच्या १.४१ डॉलर्सबरोबर आहे.
प्रवासी विम्यात किती भरपाई मिळते
अपघाती मृत्यू झाल्यास २५ लाख ते १ कोटी रुपये मिळतात.
कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५ ते १० लाख रुपये मिळतात.
रुग्णालयात दाखल झाल्यास निश्चित भरपाई मिळते.
परंतु जे प्रवास करण्यापूर्वी विमा खरेदी करतात त्यांनाच हा लाभ मिळतो. आजही अनेकजण या पर्यायाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे विमान प्रवास अथवा कुठलाही प्रवास करताना प्रवासी विमा असणे आवश्यक असते.
विमा खरेदी केला नसेल तर
सरकारकडून स्वेच्छेने दिली जाणारी देणगी
क्रेडिट कार्ड लिंक्ड प्रवास विमा
यावर अवलंबून राहावे लागते. मागील काही काळात घडलेल्या अपघातांमध्ये कुटुंबांना भरपाईसाठी अनेक महिने, वर्षे वाट पाहावी लागली. अजूनही या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. ज्या प्रवाश्यांकडे कोणताही प्रवास विमा किंवा नामांकित व्यक्तीची माहिती नव्हती अशा प्रकरणांमध्ये कुटुंबांना ग्राहक न्यायालये, दिवाणी न्यायालये किंवा विमा लोकपाल सारख्या तक्रार निवारण संस्थांकडे जावे लागू शकते.
प्रवाश्यांनी हे जरूर करावे
प्रवास करण्यापूर्वी विमा खरेदी करावा
अपघाती मृत्यू आणि वैद्यकीय कव्हर असलेल्या विम्याची निवड करावी
विमा कागदपत्रांच्या डिजिटल आणि छापील प्रती जपून ठेवा
अहमदाबाद दुर्घटनेत किती मदत मिळेल?
आंतरराष्ट्रीय विमानात कुठल्याही प्रकारे मृत्यू झाल्यास अथवा जखमी झाल्यास प्रवाश्यास मॉन्ट्रियल करार १९९९ नुसार भरपाई देणे विमान कंपनीस बंधनकारक आहे. प्रवाश्याचा मृत्यू झाल्यास या करारानुसार १ लाख २८ हजार ८२१ एसडीआर पर्यंत मदत मिळू शकते. ही रक्कम भारतीय चलनात सुमारे १.४ कोटी रुपये होते. त्यामुळे अहमदाबाद अपघातातील मृतांच्या वारसांना किमान १.४ कोटी रुपयांची भरपाई कंपनीकडून मिळेल.









