राज्यात १५ ऑगस्टला मांसविक्रीबंदीवरून वादंग ; काय आहे नेमकं प्रकरण ?


मुंबई । राज्यातील काही महापालिकांनी स्वातंत्र्यदिनी मांसविक्री व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांनी १५ ऑगस्टसह इतर काही धार्मिक सणांच्या दिवशी मटन, चिकन आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत १५ ऑगस्टसारख्या राष्ट्रीय दिनी अशा प्रकारची बंदी योग्य नसल्याचे म्हटले. धार्मिक श्रद्धेशी निगडित प्रसंगी तात्पुरती बंदी लागू शकते, मात्र सर्वसामान्यांना अशा दिवशी अडचण होईल, असे त्यांचे मत आहे.

तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या निलंबनाची मागणी केली. स्वातंत्र्यदिनी काय खायचं हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा आहे, आम्ही नॉनव्हेज खाणारच, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. त्यांनी आपल्या घरातील काही पारंपरिक सणांवर मांसाहारी नैवेद्य दिला जातो, हेही सांगितले.

महापालिकांच्या आदेशानुसार १५ ऑगस्ट, २० ऑगस्ट (श्रीकृष्ण जयंती व जैन पर्व) आणि २७ ऑगस्ट (गणेश चतुर्थी व जैन संवत्सरी) या दिवशी सर्व मांस विक्री व कत्तलखाने बंद राहणार आहेत.

या दिवशी कत्तलखाने राहणार बंद
धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मालेगाव शहरातील सर्व खाजगी कत्तलखाने, म्हैस मांस विक्रेते, बकरा मटन व कोंबडी मटन विक्रेते यांनी आपली दुकाने 15, 20 आणि 27 ऑगस्ट या दिवशी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, छत्रपती संभाजीनगरमध्येही 15 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व कत्तलखाने बंद राहणार आहेत. महानगरपालिकेच्या आदेशानुसार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती 20 ऑगस्ट आणि जैन पर्युषण पर्व व 27 ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी, जैन संवत्सरी असल्याने या तिन्ही दिवशी सर्व मांस दुकाने, कत्तलखाने आणि संबंधित व्यवसाय पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

error: Content is protected !!