नाशिक । नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या कर्मचार्यांच्या आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. यावेळी त्यांनी आपल्याच महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला.
जुलै महिन्यापासून आदिवासी आश्रमशाळांमधील तासिका पद्धतीने काम करणारे कर्मचारी आंदोलन करत असून, बाह्यस्रोतांद्वारे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेचा त्यांनी विरोध केला आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, त्यांच्या जागी बाहेरून भरती केली जात असल्याने त्यांच्या सेवांवर गदा येत आहे.
या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मंत्री अशोक उईके म्हणाले, हे आंदोलन बेकायदेशीर आहे. पात्र शिक्षकांचीच भरती केली जात आहे. जे आंदोलन करत आहेत, त्यांच्यातील जे पात्र शिक्षक आहेत त्यांना सेवेत सामावून घेतले आहे. मात्र जे पात्र नाहीत, त्यांना सेवेत घेतले जाणार नाही.
लत्यांनी पुढे सांगितले की, चुकीच्या आंदोलनांना कोणीही पाठींबा देऊ नये. त्यांच्या या विधानावरून त्यांनी आपल्याच सत्ताधारी सहकार्यांनाही टोला लगावल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, या आंदोलनाला मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर आणि आमदार नितीन पवार यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी उईके यांना संबंधित प्रश्न विचारताच त्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.









