नाशिक । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ जून रोजी नाशिक दौर्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळयाच्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत प्रथमच १३ आखाडयांचे साधू महंत एकत्र येणार आहेत. या बैठकीसाठी प्रशासनाकडून जागेचा शोध घेण्यात येत आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी नाशिक दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळयाचा आढावा घेत प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र अद्याप प्राधिकरणाबाबतचा अध्यादेश प्राप्त झालेला नाही.
सिंहस्थ कुंभमेळयाच्या तारखा जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळावी अशी आखाडा परिषदेची मागणी होती.
साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात या तारखा जाहिर होण्याची शक्यता होती मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने या तारखा जाहीर होऊ शकल्या नाही त्यामुळे साधू महंतांमध्ये नाराजीचा सूर होता.
मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नाशिकमध्ये येऊन आखाडा परिषदेसोबत तारखा जाहीर करण्याबाबत निश्चित केले आहे. त्यानूसार १ जून रोजी मुख्यमंत्री नाशिक दौर्यावर येत आहेत. १ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत कुंभमेळा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनही तयारीला लागले आहे. सध्या तरी ही बैठक शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात होणार असल्याचे सांगण्यात येते. परंतू, १३ आखाडयांचे २६ प्रतिनिधी, प्रमुख महंत, जिल्हयातील आमदार, मंत्री, तसेच अधिकारी वर्ग उपस्थित राहणार असल्याने या बैठकीसाठी जागेचा शोध सुरू आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे बैठक घ्यावी असे ठरले होते परंतू व्यासपीठावर मंत्री अन साधू महंत खाली बसतील हे योग्य नसल्याने तुर्तास तरी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
नाशिक येथे वैष्णव तर त्र्यंबकेश्वर शैव आखाडे स्नान करतात. पेशवेकाळापासून ही परंपरा चालत आली आहे. हे दोन्ही पंथीय अपवादानेच एकत्र आलेले दिसून येतात. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी नाशिक-त्र्यंबक की त्र्यंबक-नाशिक कुंभमेळा यावरून वाद निर्माण झाला.
काही दिवसांपूर्वी त्र्यंबक येथे भेट दिल्यानंतर तेथील साधू महंतांसोबत चर्चा केली होती त्यामुळे नाशिकसाठी स्वतंत्र वेळ द्यावी अशी मागणी नाशिकच्या आखाडा परिषदेकडून करण्यात आली. परंतू यंदा प्रथमच १३ आखाडयांचे साधू महंत बैठकीच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.







