नाशिककरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद

नाशिक । नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील जलशुध्दीकरण केंद्रे आणि जलकुंभ येथे प्रगत स्काडा प्रणाली बसवण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रणालीच्या चाचणी व कार्यान्वयनासाठी, तसेच बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्राजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या सबस्टेशनच्या चाचणीसाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कंपनी लि. मार्फत १० मे रोजी नियोजित शटडाऊन घेण्यात येणार आहे.


या शटडाऊनमुळे संपूर्ण नाशिक शहरातील सर्व जलशुध्दीकरण केंद्रे आणि पंपिंग स्टेशन पूर्ण दिवसासाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे १० मे रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तसेच ११ मे रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या जलविभागाने स्पष्ट केले आहे.

गंगापूर धरण, मुकणे धरण आणि चेहेडी येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनसुद्धा या शटडाऊनच्या कालावधीत कार्यरत राहणार नाहीत. याशिवाय, मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील सबस्टेशनमध्ये प्रतिबंधात्मक देखभाल आणि तांत्रिक तपासणीही केली जाणार आहे.

महापालिकेने नागरिकांना पूर्वसूचना देत १० मे रोजीच्या पाणीबंदीची नोंद घेण्याचे आणि आवश्यकतेनुसार पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. या तांत्रिक सुधारणा आणि स्काडा प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर जलपुरवठा व्यवस्थेमध्ये अचूक नियंत्रण, पाणी गळती कमी होणे व कार्यक्षम व्यवस्थापन शक्य होणार आहे, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!