साधुग्रामसाठी १२०० एकर जागा संपादित करणार ; मुख्यमंत्री

नाशिक । आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक साधुग्रामसाठी तब्बल १२०० एकर जागा टप्प्याटप्प्याने संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे आगामी कुंभमेळ्यांतील जागेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिक येथे कुंभमेळा विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

त्र्यंबकरोडवरील ठक्कर मैदान येथे झालेल्या या भव्य कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, क्रीडामंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, तसेच सुहास कांदे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यंदाचा कुंभ हा विशेष आहे. ७५ वर्षांनंतर त्रिखंड योग जुळून आल्याने हा कुंभपर्व तब्बल २८ महिने सुरू राहणार आहे. या कालावधीत ४२ पर्वस्नानं होतील आणि मागील कुंभापेक्षा पाचपट अधिक साधू-महंत व भाविक नाशिकमध्ये येतील. त्यांच्या स्वागतासाठी व सोयीसाठी केंद्र व राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने नाशिकमध्ये अनेक आधुनिक आणि दिर्घकालीन विकासकामांचा आराखडा राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात बाह्य रिंगरोड, ओझर विमानतळावर नवीन टर्मिनल, आधुनिक बस स्थानके, सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याबरोबरच डिजिटल कुंभ साकारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकचा कुंभ स्चच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्याकरीता राज्य सरकार कटीबध्द असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी आ. देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे आदींसह प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले.

कोणालाही पाठीशी घालणार नाही
यावेळी बोलतांना मुख्यमंत्रयांनी म्हणाले की, कुंभमेळयाची विकास कामे करत असतांना माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, काही लोकांना त्रास होईल. परंतू आम्ही कोणाचे नुकसान होउ देणार नाही त्यामुळे हे कार्य पुढे नेतांना आपणही आम्हाला सहकार्य करा असे आवाहन त्यांनी नाशिककरांना केले.

त्याचप्रमाणे दर्जेदार कामे करतांना ठेकेदारही त्याच तोडीचे असणे आवश्यक असते परंतू ज्यांना कामे मिळत नाही ते माध्यमातून आरोप करतात. परंतू यानिमित्ताने एक आश्वासन देतो, सर्व कामे पारदर्शक पध्दतीनेच होतील. टेंडरमध्ये हस्क्षेप होणार नाही. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही त्यामुळे सर्व काही अधिकार्‍यांवर सोडून द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


अध्यात्मातून विकासाची गंगा वाहणार : शिंदे
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुंभमेळा नाशिकला जगाच्या नकाशावर स्थान देणारा सोहळा ठरेल. शासन आणि प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून, या निमित्ताने नाशिकचा चेहरामोहरा बदलणार आहे.

साधू-संतांच्या पवित्र पावलांनी नाशिक धन्य होणार आहे आणि अध्यात्माच्या या उत्सवातून विकासाची गंगा नाशिकमध्ये येईल. आव्हाने अनेक आहेत परंतू शासन आणि प्रशासन याचे नियोजन करत असून निश्चितपणे एक सुरक्षित आणि सुंदर कुंभ आपण करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारा कुंभ : महाजन
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर नाशिकच्या पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाला नवी चालना देणारा जागतिक सोहळा आहे. प्रयागराजमध्ये कुंभासाठी स्वतंत्र जागा आहे, पण नाशिक-त्र्यंबक परिसरात जागेची मर्यादा आहे. तरीही आम्ही स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभ घडविण्याचा निर्धार केला आहे.

कुंभ आपला आहे, आपल्या शहराचा आहे. या कामात सहभागी होऊन नाशिकचा गौरव वाढवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या माध्यमातून नाशिकच्या पर्यटनाला आणि धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाची ठळक वैशिष्टै
चित्रफितीव्दारे मांडण्यात आला कुंभ विकासाचा आराखडा
महापालिकेच्या ३३८७ कोटींच्या कामांचा शुभारंभ
रामकाल पथ प्रकल्पाचे चित्रफीतीव्दारे सादरीकरण
कुंभमेळा बोधचिन्ह स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ
कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केले रामकाल पथ प्रकल्पाचे भूमीपूजन
मुख्यमंत्रयांसह मान्यवरांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन

error: Content is protected !!