मुंबई : एचडीएफसी बँकेनं बचत खात्यांतील रोख व्यवहारांसंदर्भात मोठे बदल केले असून त्याचा परिणाम थेट खातेदारांवर होणार आहे. आता बचत खातेदारांना स्वतःकडून किंवा इतर व्यक्तीकडून महिन्याला फक्त १ लाख रुपयांपर्यंतच रक्कम जमा करता येईल. यापूर्वी ही मर्यादा २ लाख रुपये होती. मोफत रोख व्यवहारांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच चार ठेवण्यात आली आहे. मात्र, चौथ्या व्यवहारानंतर प्रत्येक रोख व्यवहारावर १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

त्रयस्थ व्यवहारांवरील मर्यादा
खातेदाराऐवजी नातेवाईक, मित्र किंवा प्रतिनिधीने केलेल्या रोख व्यवहारांवर आता जास्त लक्ष ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारे २५ हजार रुपयांपर्यंतच रक्कम जमा किंवा काढता येईल. चार मोफत व्यवहारांनंतर प्रत्येक व्यवहारावर प्रति हजार रुपये ५ रुपये किंवा किमान १५० रुपये शुल्क आकारले जाईल.
डिजिटल व्यवहारांवरील शुल्क
- एनईएफटी (NEFT):
१० हजार पर्यंत – ₹२
१० हजार ते १ लाख – ₹४
१ लाख ते २ लाख – ₹६
२ लाखांपेक्षा जास्त – ₹२४ - आरटीजीएस (RTGS):
२ लाख ते ५ लाख – ₹२०
५ लाखांपेक्षा जास्त – ₹४५ - आयएमपीएस (IMPS):
१ हजारपर्यंत – ₹२.५०
१ हजार ते १ लाख – ₹५
१ लाखांपेक्षा जास्त – ₹१५
इतर शुल्क
- ईसीएस/एसीएच व्यवहार फेल झाल्यास दंड :
पहिल्यांदा ₹४५०, दुसऱ्यांदा ₹५००, तिसऱ्यांदा ₹५५० - प्रमाणपत्रे (शिल्लक, व्याज, पत्ता पडताळणी): ₹१०० (ज्येष्ठ नागरिकांसाठी ₹९०)
- जुन्या रेकॉर्ड व चेक प्रत: ₹८०
- चेकबुक: वर्षातून फक्त १० पाने मोफत, अतिरिक्त प्रत्येक पानासाठी ₹४ शुल्क (पूर्वी २५ पाने दिली जात होती)
किमान शिल्लक नियम कायम
किमान मासिक सरासरी शिल्लक रक्कमेत बदल होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत बँकेने स्पष्ट केले की, किमान शिल्लक ठेव नियम पूर्ववत राहणार आहेत.
एचडीएफसी बँकेचे हे नवे नियम १ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. या बदलांमुळे मध्यमवर्गीय व लहान खातेदारांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागणार आहे.











