CM Devendra Fadanvis : सिंहस्थासाठी नाशिक सज्ज ; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा आज दौरा

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवार, दि. १३ रोजी नाशिक दौर्‍यावर येत असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, रामकाल पथ, सीसीटीव्ही आदींसह सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू, महंत आणि भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रत्येक गोष्टीचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे मुदतीत पूर्ण होतील, अशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे.

निवडणूक आचारसंहितेपूर्वी या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने ही कामे सुरू करण्यास आचारसंहितेचा कुठलाही अडसर येणार नाही, याची काळजी घेऊनच या कामांचा शुभारंभ करण्यात येत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. ५,६५७ कोटी रुपयांच्या सिंहस्थ कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी ठक्कर मैदान येथे मुख्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

असा आहे दौरा
सकाळी ११:०० वाजता मुख्यमंत्र्यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल. तेथून ओझरहून ते रामकुंड, गोदावरीकडे प्रयाण करतील. रामकुंड येथे रामकाल पथ नियोजित कामाची पाहणी ते करतील. १२:०० वाजता काळाराम मंदिर, सीतागुंफा येथे रामकाल पथ मार्गाची ते पाहणी करतील. १२:३० वाजता जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येईल. यानंतर ठक्कर मैदान येथे आयोजित मुख्य सोहळ्यात कुंभमेळा कामांचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येईल. दुपारी २:०० वाजता ते ओझर विमानतळाहून मुंबईकडे प्रयाण करतील. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

या कामांचा होणार शुभारंभ
डहाणू ते छत्रपती संभाजीनगर सहापदरी काँक्रीटीकरण
चिंचोली ते पांढुर्ली रस्ता सुधारणा
वाढीवरहे ते नागलवाडी रस्ता रुंदीकरण
२,२७० कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामे
शहरात नवीन पूल बांधणे
गोदाकाठावरील पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार
मुकणे धरण पाणीपुरवठा योजना विस्तारीकरण
अमृत योजनेंतर्गत शहरासाठी पाणीपुरवठा योजना
साधुग्रामसाठी जलकुंभ उभारणे
मलनिस्सारण प्रकल्प उभारणे
स्मार्ट सिटी सीसीटीव्ही बसविणे
स्मार्ट सिटीसाठी फायबर ऑप्टिक केबल टाकणे
आडगाव येथे इलेक्ट्रिक बस डेपो उभारणे
बिटको रुग्णालयात नवजात शिशु कक्ष स्थापन करणे

error: Content is protected !!