मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार कुंभमेळा कामांचे भूमीपूजन

नाशिक । सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने सुमारे ७ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. असे असले तरी अद्याप प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात आलेली नसल्याने साधू-महंतांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आता निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळा विकासकामांचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान या कामांचे भूमीपूजन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे पाच कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत ७ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र नाशिकनंतर होणाऱ्या उज्जैन कुंभमेळ्यासाठी कामे प्रगतीपथावर असताना नाशिकमध्ये अद्याप कामांना सुरुवात झालेली नसल्याने काहीसा नाराजीचा सूर आहे.

प्रशासनाकडून हजारो कोटी रुपयांची कामे मंजूर केली गेल्याचा दावा करण्यात येत आहे. या कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पावसाळा संपताच या कामांना सुरुवात होणार असल्याचेही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मात्र अद्यापपर्यंत कामाला सुरुवात झालेली दिसून येत नाही.

कुंभमेळा कामांमध्ये रिंगरोड, रस्ते विकास, नवीन घाटांची निर्मिती, साधुग्रामसाठी जागेचे संपादन, पाणीपुरवठा योजना, रामकाल पथ, दर्शन पथ आदी कामांचा समावेश आहे. यातील कोणत्या कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करता येणे शक्य आहे, याचा अभ्यास करून तशी यादी सीएमओ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

साधारणपणे ६ ते १० नोव्हेंबर दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौर्‍यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत या कामांचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याचे समजते.

error: Content is protected !!