नाशिक । नाशिकच्या पवित्र रामकुंड घाटावर सोमवारी एक हृदयद्रावक घटना घडली. बीड जिल्ह्यातून आलेल्या एका तरुणाचा पाय घसरून तो गोदावरी नदीत पडला आणि क्षणार्धात जोरदार प्रवाहात वाहून गेला. या घटनेमुळे रामकुंड परिसरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदी पात्रात सध्या तब्बल 1 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीचा प्रवाह प्रचंड तीव्र आहे. घटनास्थळी तातडीने आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र अंधार आणि वेगवान प्रवाहामुळे शोधकार्याला अडथळा निर्माण झाला.
बुधवारी सकाळपासून शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली वाहून आल्यामुळे, त्या पानवेलीतच तरुण अडकला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे युद्धपातळीवर पानवेली हटवण्याचे काम सुरू असून, या कामासाठी जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि स्थानिक प्रशासन सतत कार्यरत आहे. दरम्यान, सध्या श्राद्धपक्ष असल्यामुळे रामकुंड परिसरात भाविकांची मोठी वर्दळ आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांना नदी पात्रात न उतरण्याचे आणि पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण रामकुंड परिसरात चिंता आणि भीतीचे वातावरण पसरले असून, तरुणाच्या शोधासाठी सर्व यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत.







