कामावर जात असतांना अंगावर झाड कोसळल्याने युवकाचा मृत्यू

नाशिक । वादळी वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसात अचानकपणे झाड पडल्याने २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्याच्यासोबत त्याचा मित्र देखील गंभीर जखमी झाला. गौरव भास्कर रिपोटे (२१, रा. देवळाली गाव) असे या युवकाचे नाव असून त्याचा मित्र सम्यक जखमी झाला आहे. हे दोघे दुपारी कंपनीत कामासाठी जात होते.


गौरव रिपोटे हा नाशिकरोड येथील रेल्वे मालधक्का रोड येथील रमाबाई आंबेडकर नगर येथील रहीवासी असून सोमवारी दूपारी ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास आपल्या अ‍ॅक्टिव्हावरून महिंद्रा कंपनीकडे कामासाठी जात होता. यावेळी टपारिया कंपनीजवळून जात असतांना एक झाड त्याच्या अंगावर पडल्याने त्याच्या चेहर्‍यास व डोक्यास गंभीर दुखापत होऊन तो बेशुध्द झाला. त्यास तात्काळ उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र सम्यक भोसले (वय १९ रा. आंबेडकर नगर) हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरात पावसाचा कहर, २१ मिमी पावसाची नोंद
शहरात सोमवारी दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. अवघ्या काही तासांत २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतुकीचा खोळंबा, घरांमध्ये पाणी शिरणे, विजेचा पुरवठा खंडित होणे यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

झाडे कोसळल्याने वाहनांचे नुकसान
महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात एकूण ६० ठिकाणी झाडे कोसळली. ठक्कर बाजार येथील बसस्थानक परिसरात गुलमोहराची दोन झाडे कोसळून दोन दुचाकींना नुकसान झाले. एन.डी. पटेल रोडवरील बीएसएनएल कार्यालयाजवळ पडलेल्या मोठ्या झाडामुळे तीन विजेचे खांब वाकले आणि बीएसएनएलच्या केबलचे नुकसान झाले. दिवसभर रस्ता बंद ठेवण्यात आला होता. अग्निशामक दलाच्या पथकाने झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. सातपूर परिसरात २५ झाडे कोसळली तर सिडको ११, पंचवटी ११, के.के.वाघ परिसर ६, महापालिका मुख्यालय हदिदत ७ झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.

रस्त्यांना नदीचे स्वरूप
मेनरोड, सराफ बाजारसारख्या मध्यवर्ती रस्त्यांवर नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक दुकानांत पाणी शिरल्याने व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले. पाथर्डी फाटा, पंचवटी, कॉलेज रोड, अंबड एमआयडीसीसह शहराच्या विविध भागांमध्ये चार ते पाच फूट पाणी साचल्याने वाहने बंद पडली, तर वाहतूक पूर्णतः कोलमडली.महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण केल्याचा दावा केला असला तरी, काही तासांच्या पावसानेच त्या दाव्यांची पोलखोल केली आहे. अनेक भागांत झाडे कोसळल्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला आहे.

error: Content is protected !!