शालेय अभ्यासक्रमात ‘योगाभ्यास’

केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव : नाशिक येथे घेतला आढावा

नाशिक । भारतीय संस्कृतीत अगदी ॠषीमुनींपासून योगाचा प्रचार-प्रसार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील योगाचा प्रचार-प्रसार करतांना आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू केला. यंदा ११ वा योग दिन आपण साजरा करणार आहोत. योगाचा खेळात सामावेश करण्यात आला आहे. आता लवकरच शालेय अभ्यासक्रमातही योगाभ्यास या विषयाचा समावेश केला जाईल असे केंद्रीय आयुष मंत्रालय व स्वास्थ आणि कल्याण मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी सांगितले.


नाशिक येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आढावा बैठकीप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी तसेच लहान मुलांमध्ये योगाची आवड निर्माण व्हावी याकरीता केंद्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात ‘योगाभ्यास’ या विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्प्याने लागू तो लागू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

आजारानूसार योगाचे पॅकेज
योगाचा प्रचार प्रसार करण्यात येत आहे. आता तर योगाचा खेळातही सामावेश करण्यात आला आहे. योगाचे महत्व लोकांना पटू लागले आहे. देशभरात विविध संस्थांव्दारे योगाचा प्रचार प्रसार करण्यात येत आहे. आयुष मंत्रालयाने आजारानूसार पॅकेज करण्याचा निर्णय घेतला आहे. जसे की, एखाद्याला ब्लड प्रेशरचा त्रास असेल कुणाला मधुमेह असेल किंवा गरोदर मातांसाठी कोणते योगा केले पाहिजे याचे व्हीडीओ तयार करण्यात येऊन ते आम्ही सोशल मिडीयाव्दारे नागरीकापर्यंत पोहोचवणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

जिल्हा रूग्णालयात कँसर डे केअर सेंटर
गेल्या काही वर्षांत वाढत्या गंभीर आजारांनी ग्रामीण भागातही पाय रोवले असून, योग्य उपचार व सुविधेच्या अभावामुळे अनेक रुग्णांचे हाल होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर आयुषमंत्री जाधव यांनी ग्रामीण आरोग्य सेवेला बळकट करण्यासाठी ही महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. मंत्री जाधव म्हणाले, कॅन्सरसारखा जीवघेणा आजार आणि डायलिसिससारखी नियमित सेवा गरजू रुग्णांसाठी खूप महत्त्वाची आहे. आतापर्यंत त्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. पण आता हे उपचार स्थानिक स्तरावर मिळावेत याकरीता अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशातील २०० जिल्हा रूग्णालयात ‘कँन्सर डे केअर सेंटर’ सुरू करण्याची घोषणा केली त्यामुळे आता ग्रामीण भागातील रूग्णांना उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही तसेच लवकरच ग्रामीण भागात डायलिसीस सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुंभमेळयात उभारणार आयुष सेंटर
नाशिक येथे होणारया सिंहस्थ कुंभमेळयात आयुष सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रयागराज कुंभमेळयातही असे सेंटर सुरू करण्यात आले होते. त्याचधर्तीवर नाशिकमध्येही हे सेंटर सुरू केले जातील. ज्यामुळे बाहेरील राज्यातून किंवा जिल्हयातून येणार्‍या भाविकांना जर आयुष उपचार घ्यायचे असतील तर ते सर्व उपचार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

वैद्यकिय महाविद्यालयांसाठी पाचशे कोटी
नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संचलित 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारतीच्या बांधकामाला राज्यशासनाच्या वतीने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. परंतू सध्या हे विद्यालय जिल्हा रूग्णालयात सुरू करण्यात आले असून प्रशासनात समन्वय नसल्याचे दिसून येते याबाबत विचारले असता जाधव म्हणाले, देशभरात असे विद्यापीठ सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. याकरीता पाचशे कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून लवकरच हे विद्यालय स्वतंत्र जागेत निर्माण केले जाईल असे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!