मुंबई । सलग दोन वेळा रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) आगामी जून महिन्यातील पतधोरण समितीची बैठक महत्त्वाची ठरणार आहे. 4 ते 6 जूनदरम्यान होणार्या बैठकीत 6 जून रोजी रेपो रेटसंदर्भात निर्णय होणार आहे.
फेब्रुवारी व एप्रिलमध्ये आरबीआय ने प्रत्येकी 25 बेसिस पॉईंटने कपात करत रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.00 टक्क्यांवर आणला आहे. जूनच्या बैठकीत देखील 25 बेसिस पॉईंटनी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे रेपो रेट 5.75 टक्क्यांवर येऊ शकतो.
किरकोळ महागाईचा दर सलग दोन महिन्यांपासून 4 टक्क्यांखाली असून, एप्रिलमध्ये तो 3.16 टक्क्यांवर गेला आहे – ही मागील सहा वर्षातील निचांकी पातळी आहे. खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यानेही महागाईमध्ये घसरण झाली आहे. याशिवाय चांगल्या मान्सूनचा अंदाज आणि डाळ-धान्याच्या दरात घट झाल्यामुळे महागाई नियंत्रणात राहण्याची अपेक्षा आहे.
नोमुराने दिलेल्या अंदाजानुसार, 2025 च्या दुसर्या तिमाहीत महागाईचा दर 3 टक्क्यांखाली जाण्याची शक्यता असून वर्षाच्या दुसर्या सहामाहीत तो 3.34 टक्के राहू शकतो. त्यामुळे आरबीआय पुढील धोरणांमध्ये विकासाला प्राधान्य देत रेपो रेट कमी करण्याच्या दिशेने जाऊ शकते.
रेपो रेटमध्ये कपात झाल्यास गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेणार्यांना थेट फायदा होतो. बँका आपले व्याजदर कमी करतात आणि त्यामुळे नव्याने कर्ज घेणारे तसेच रेपो रेटशी निगडीत दरावर कर्ज घेतलेले ग्राहक दोघांनाही दिलासा मिळतो.









