चिमुरड्याचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार होणार?

नाशिक । वडनेर भागात मुक्त संचार करणार्‍या बिबटयाचा बंदोबस्त करावा याकरीता ग्रामस्थांनी आज नाशिक शहरातून मोर्चा काढला. भर पावसात काढण्यात आलेल्या मोर्चाची नाशिकच्या वनविभागाच्या कार्यालयावर सांगता करण्यात आली. सात दिवसांच्या आत बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा अल्टिमेटम ग्रामस्थांनी वनविभागाला दिला आहे. दरम्यान, बिबट्या जेरबंद झाला नाही तर त्याला शूट आऊट करण्याची परवानगी वरिष्ठांकडे मागण्यात आल्याची माहिती वनअधिकार्‍यांनी दिली.

ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर सात दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त झाला नाही, तर आठव्या दिवशी आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू. दहा दिवसांपूर्वी रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय आयुष भगतचा मृत्यू झाला होता.

अंत्यसंस्कारापूर्वी आयुषच्या आठ वर्षीय बहिणीने त्याला राखी बांधत शेवटचा निरोप दिल्याने संपूर्ण गाव हळहळले होते. या घटनेमुळे ग्रामस्थांत प्रचंड संताप असून, आज भरपावसात वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत ग्रामस्थांनी अधिकार्‍यांना जाब विचारला.

१९ पिंजरे, ट्रॅप कॅमरे
वडनेर भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १९ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. दोन पथके तैनात असून, आणखी दोन पथके नियुक्त करण्याचे आश्वासन वनअधिकार्‍यांनी ग्रामस्थांना दिले आहे. वडनेर भागात बिबटयाचा मुक्त संचार वाढला असून यामुळे परिसरातील नागरकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने बिबटयाचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!