मुंबई । राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयानुसार पहिलीपासूनच हिंदी शिकवली जाणार असल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन सरकारची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र राज ठाकरेंनी आपला विरोध कायम ठेवला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मनसेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत, हिंदीला विरोध नाही, पण पहिलीतून सक्तीने हिंदी शिकवण्याला विरोध आहे, असे मत मांडले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका मांडताना, ठाकरे बंधूंची भूमिका चुकीची नाही. पहिलीपासून हिंदीची सक्ती योग्य नाही. पाचवीपर्यंत मातृभाषेला प्राधान्य मिळाले पाहिजे. देशात हिंदी बोलणारा मोठा वर्ग आहे, पण लहान मुलांवर भाषेचा अनावश्यक ताण टाकणे अयोग्य आहे, असे मत व्यक्त केले.
शरद पवारांनी स्पष्ट केले की, मातृभाषा बाजूला पडू नये, यासाठी सरकारने पाचवीपूर्वी हिंदी शिकवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. तसेच, ६ जुलै रोजी मनसेच्या वतीने आयोजित मोर्चावर बोलताना त्यांनी सांगितले की, “सर्व पक्षांची भूमिका ऐकूनच निर्णय घेऊ. आमचा दृष्टिकोन नकारात्मक नाही.
६ जुलैला मोर्चाचे आयोजन
राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे की, ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरून मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नसेल, तर तो मराठी माणसाचा असेल. शिक्षण आणि भाषा तज्ज्ञ, पालक व विद्यार्थी या मोर्चात सहभागी होतील. सरकारला हे दाखवायचं आहे की महाराष्ट्र काय विचार करतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.










