नाशिक । देशभरात कांद्याच्या वाढत्या उत्पादनामुळे संभाव्य किंमत घसरणीच्या संकटाला तोंड देण्यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे कांद्याच्या निर्यातीस चालना देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
खासदार वाजे यांनी दोन महत्त्वाच्या मागण्या केंद्र सरकारसमोर मांडल्या आहेत. सध्या निर्यात केलेल्या कांद्यावर लागू असलेली शुल्क व कर सवलत योजना (Remission of Duties and Taxes on Exported Products – RoDTEP) दर वाढवून किमान ५% पर्यंत करावी. सध्या या योजनेअंतर्गत फक्त १.९९% इतकीच सवलत मिळते, जी आंतरराष्ट्रीय स्पर्धक देशांपेक्षा कमी आहे. दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे, मालवाहतुकीसाठी ७% पर्यंत अनुदान देण्यात यावे, जेणेकरून लघु व मध्यम निर्यातदारांना परवडणार्या दरात कांदा निर्यात करता येईल.
या मागण्यांमागील कारण स्पष्ट करताना वाजे म्हणाले की, ऑगस्ट महिन्यापासून दक्षिण भारतात नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक अपेक्षित आहे, त्यामुळे देशांतर्गत बाजारात मोठा अतिरिक्त पुरवठा होईल आणि याचा थेट परिणाम भावांवर होणार आहे. अशी स्थिती निर्माण होण्यापूर्वी निर्यात वाढवून बाजारसंतुलन राखणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले.
कांद्याचा दर कोसळायला सुरवात झाली आहे, अजून २ ते ३ आठवड्यात देशभरात होऊ घातलेले वाढीव उत्पादन लक्षात घेता कांदा शेतकर्यांना बाजारात नेणे सुद्धा परवडणार नाही इतके दर खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संकट उभे राहण्याआधीच उपयोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी अडचणीत येऊ नये हेच माझे उद्दिष्ट आहे. सरकार कडून भरपूर अपेक्षा आहेत, त्यांनी अपेक्षा भंग करू नये हीच आशा आहे.
राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक लोकसभा










