नेपाळ का पेटले ? कोण आहे Gen z झी आंदोलनाचा नेता ?

काठमांडू । नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांनी देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भडकलेल्या तरुणांच्या तीव्र आंदोलनानंतर पंतप्रधान के. पी. ओली यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला. परंतू नेपाळ अचानक का पेटले ? पंतप्रधानांना राजीनामा का द्यावा लागला ? कोण आहे या आंदोलनाचा नेता ? जाणून घेवूया…

सोशल मीडियावरील बंदी ठरली ठिणगी
४ सप्टेंबर रोजी सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब आणि एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी जाहीर केली होती. कारण या कंपन्यांनी सरकारच्या आदेशांनुसार नोंदणी केलेली नव्हती. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम तरुण पिढीवर झाला आणि देशभर संतापाची लाट उसळली.

आंदोलनात शेकडो तरुणांचा सहभाग
८ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच हजारो विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरले. त्यांनी शालेय गणवेश, पुस्तके आणि बॅग घेऊन शांततामय रॅली काढली. मात्र, दुपारपर्यंत परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि आंदोलक संसद भवनापर्यंत पोहोचले. पोलिसांच्या कारवाईत किमान २० जणांचा मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक जखमी झाले.

सुदान गुरुंग झाले आंदोलनाचे चेहरा
या जनआंदोलनाचे नेतृत्व ३६ वर्षीय युवा नेते आणि समाजसेवक सुदान गुरुंग यांनी केले. २०१५ मधील भूकंपानंतर त्यांनी स्थापन केलेल्या “हामी नेपाल” या संस्थेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली होती. आपत्ती निवारण, पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यामुळे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. या आंदोलनातही त्यांनी आघाडी घेतली.

२०१५ मध्ये भूकंपात गुरूंग याने त्याचा मुलगा गमावला. त्यानंतर तो आपत्ती निवारणाच्या कामात हिरीरीने सहभाग घेउ लागला. धारण येथील कोईराला आरोग्य विज्ञान संस्थेच्या कारभारातील पारदर्शकतेसाठी त्याने आंदोलनाची हाक दिली होती. त्याच्या नेतृत्वाखाली घोपा कॅम्प आंदोलन पार पडले. त्या आंदोलनामुळे त्याला ओळख मिळाली. सुदान गुरुंग तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

2025 मध्ये सुरुवातीला जेव्हा भारतातील भुवनेश्वर येथे शिकणार्‍या एका नेपाळी विद्यार्थिनीने तिच्या प्रियकराकडून छळ सहन केल्यानंतर आत्महत्या केली. तेव्हा हामी नेपाळने हा मुद्दा उघडपणे उपस्थित केला. त्यावेळी, तिचे सदस्य लाल कपडे घालून आणि संस्थेचा लोगो घेऊन माहिती शेअर करत राहिले. 4 सप्टेंबरला सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर सुदान गुरुंग यांनी 8 सप्टेंबर रोजी काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणात निषेधाची घोषणा केली होती.

राजीनाम्यांची मालिका
आंदोलन तीव्र होताच गृहमंत्री रमेश लेखक यांनी सर्वप्रथम राजीनामा दिला. त्यानंतर सरकारने सोशल मीडियावरील बंदी उठवली. तरीदेखील संताप कमी झाला नाही. अखेर वाढत्या दबावामुळे पंतप्रधान के. पी. ओली यांनीही राजीनामा जाहीर केला. वृत्तांनुसार, ते लवकरच देशाबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!