नाशिक । नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणार्या तयारीबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि नाशिकचे आमदार छगन भुजबळ यांनी थेट सरकार आणि प्रशासनावर सडकून टीका केली आहे. त्यांनी अधिकार्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत अनेकांवर बेफिकिरी आणि निष्क्रियतेचा आरोप केला.
नाशिक येथे भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या मिशन १०० या उपक्रमात नाशिक महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय यांची कामगिरी अयशस्वी असल्याचे दिसून येत असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, हल्लीचे काही अधिकारी कामच करत नाहीत, तर काहींना आपलं कर्तव्य काय आहे हेच माहीत नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
काही अधिकार्यांना तर केवळ नाशिकमध्ये आणून बसवले असल्याचे दिसून येते. साधी साफसफाई, अतिक्रमण हटवायला ते तयार नाहीत. महापालिका हदिदत साधी वीट जरी कोणी लावली तरी अतिक्रमण काढायला हवे परंतू तक्रार केली तर, हे आमचे काम नाही तिकडे अशी उत्तरं देतात. नाशिकमध्ये पुर्वी चाकू जरी कोणी काढला तरी आरडाओरड व्हायचा आता तर दररोज चाकू घेवून गुन्हेगार फिरत आहेत जणू नाशिककरांचा त्याची सवयच झाली आहे. पोलीसांचा यावर वचक हवा असे ते म्हणाले.
आधी गोदावरी तर स्वच्छ करा
नाशिक कुंभमेळयाच्या नियोजनावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. छोटी छोटी कामे यांच्याकडून होत नाही हे काय बाकीचे करणार असा सवाल करत १६ ते १७ हजार कोटींचा आराखडा बनवला कोण देणार आहे यांना इतका निधी हे तर कळायला हवे. म्हणे रिंगरोड करणार मागच्या कुंभमेळयातच शहरात आउटर आणि बाहय रिंगरोड तयार करण्यात आले आहे. आता त्यांची दुरूस्ती करा.
नाशिक शिर्डी, नाशिक त्र्यंबक रस्त्याचीही कामे मागील कुंभमेळयातच झाली आहेत. जवळपास ८० टक्के कामे झाली आहेत आता फक्त गोदावरी नदी स्वच्छ करा, बाकी काही गरज नाही,असेही ते म्हणाले.
नाशिककरांना प्रत्यक्ष उपयोग होईल अशाच कामांवर प्राधान्य द्यावे, वरवरची कामे आणि दिखाऊ प्रकल्प नकोत. पण काय आहे फक्त टेंडर काढण्यातच लक्ष आहे, कामाच्या गुणवत्तेकडे कुणीही लक्ष देत नाही असे सांगत भुजबळ चांगलेच संतापले.










