Nashik politics : एअरपोर्टवरून पैशांच्या बॅगा कोणी घेतल्या? वाजेंचा सांगळेंना थेट सवाल

नाशिक । खासदार राजाभाऊ वाजे यांनी विधानसभेला माझ्या विरोधात काम केले, असा आरोप माजी पंचायत समिती सभापती उदय सांगळे यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करतेवेळी केला होता. याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा घडून आल्या होत्या. याबाबत खासदार वाजे हे काय बोलतात याकडे सिन्नरसह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर सिन्नर येथे पार पडलेल्या निष्ठवंतांचा मेळाव्यात वाजे यांनी मौन सोडले. त्यांनी उदय सांगळे यांना काही गंभीर सवाल केले आहेत.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी २०१९च्या विधानसभेसह २०२४ची लोकसभा आणि विधानसभा पर्यंत काय काय घडले याबाबत काही दाखले देत सांगळे यांना आरोपांच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. खासदार वाजे म्हणाले की, उदय सांगळे यांनी मागील विधानसभा निवडणुकीपासूनच माझ्या बाबत उलटसुलट आरोप करायला सुरुवात केली होती. मात्र, माझ्या स्वभावानुसार काळ या सगळ्याला उत्तर आहे असा विचार करून मी काहीही बोललो नाही. परंतु, परवाच्या भाजप प्रवेशावेळी त्यांनी थेट जाहीररित्या खासदारांनी माझ्या विरोधात काम केलं असा आरोप केला. म्हणून मला खुलासा करणे आवश्यक वाटलं,

सर्वप्रथम तर मला तुमच्या सर्टफिकेटची आवश्यकता नाही. जर मला काही करायचंच असत तर मी जेव्हा २०१९ला पराभूत झालो तेव्हा तुमच्या सौभाग्यवतीनी कोणाकोणाला फोन केले, तुमच्या भावाचे, वडिलांचे काय स्टेटमेंट होते. मी पराभूत झाल्यावर कोण काय बोलले याच भांडवल मला करता आलं असत पण मी केलं नाही.


खा. वाजे पुढे म्हणाले की, २०१७ साली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. ते लोकांना सांगताय की मी माझ्या पैशामुळे अध्यक्ष झालो, राजाभाऊ वाजेचा काहीही संबंध नाही.

परंतु, त्यांचे बंधू आणि सोमनाथ वाघ यांनी खरं सांगावं, तसेच दादा भुसे यांच्याकडे गेलो तेव्हा शैलेश नाईक माझ्यासोबत होते त्यांनी देखील खरं सांगावं. पैसे तर नरेंद्र दराडे असो की दिलीप बनकर असो यांच्याकडे पण होतेच. माझ्याकडे पैसे नसतील पण मी माझी सगळी पुण्याई पक्षश्रेष्टीकडे खर्ची घालून तुम्हाला अध्यक्ष करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पुढे तुम्ही माझ्याशी संपर्क तोडला.तुमचे कुटूंबिय माझ्या बद्दल समाजात काय काय बोलत फिरले हे देखील माझ्याकडे आहे. सगळ पुराव्यानिशी माझ्याकडे आहे. मी काय ते मांडू इच्छित नाही असा टोला देखील वाजे यांनी लगावला.

काकाटेंशी जुळवून घेण्याचा प्रयत्न
यावेळी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी गंभीर गौप्यस्फोट केलाय. १० जुलै २०२३ रोजी उदय सांगळे यांनी नाशिकच्या एका प्राध्यापकांच्या घरी माणिकराव कोकाटे यांची भेट घेत राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात एक होण्याबाबत प्रस्ताव दिल्याची माहिती वाजे यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, पुढं तुमचं का फिस्कटले मला माहित नाही.

लोकसभेला एअरपोर्टवरून बॅगा अन् पैशाच वाटप
खासदार राजाभाऊ वाजे यांनी आणखीएक मोठा गौप्यस्फोट यावेळी केला. त्यांनी थेट उदय सांगळे यांना सुनावले की, लोकसभा निवडणुकीला मला अचानक उमेदवारी मिळाली. त्यावेळी तुम्ही कोणत्या एअरपोर्टवर जाऊन कोणाकडून पैशाची बॅग घेतली. कोणत्या कोणत्या लोकांना पैसे दिले. माझ्या विरोधात कोणाकोणाला पैसे वाटायला लावले. याची सगळी नोंद माझ्याजवळ आहे.

तरीसुद्धा विधानसभा निवडणुकीवेळी तुम्ही आणि तुमचे बंधू माझ्याकडे आले आणि अंधारात वेगळं बोलले आणि विधानसभा निवडणूक झाल्यावर उजेडात जाऊन वेगळं बोलायला लागले. अशा शब्दांत वाजे यांनी सांगळेंना सुनावले. यामुळे सिन्नरच्या राजकारणात वाजे विरूध्द सांगळे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!