HPCL च्या नाशिकमधील दोनशेहून अधिक पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठा विस्कळीत ; काय आहे कारण ?

नाशिक | हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विक्री कंपनीच्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागील 36 तासांपासून देशभरातील इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. HPCLच्या सर्व डिपोंमधून पेट्रोल पंपांपर्यंतचा पुरवठा बंद झाल्याने अनेक पंपांवर इंधन मिळणे बंद झाले आहे. नाशिक जिल्ह्यात एचपीसीएलचे 200 हून अधिक पेट्रोल पंप आहेत या पेट्रोल पंपावरील इंधनपुरवठा हा विस्कळीत झाला असल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.

कंपनीचे तांत्रिक तज्ज्ञ सदर सॉफ्टवेअर प्रणाली पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, मॅन्युअल मोडने पुरवठा सुरू करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. मात्र प्रणाली एकमेकांशी जोडलेली असल्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे स्थिती पूर्णतः सुरळीत होण्यासाठी किमान आणखी 48 तास लागू शकतात, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, फामपेडाचे (फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन) अध्यक्ष गुप्ता यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “ही केवळ तांत्रिक अडचण असून पेट्रोल किंवा डिझेलचा साठा भरपूर आहे. इतर कंपन्यांसारखे इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम यांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे इंधन टंचाईचे कोणतेही कारण नाही.”

फामपेडा ने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, इंधन मिळवण्यासाठी इतर पंपांवर अनावश्यक गर्दी न करण्याचेही सूचित केले आहे. तांत्रिक बिघाड लवकरच दूर होईल आणि परिस्थिती लवकर पूर्ववत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!