पेहलगाम शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे ? काय आहे या ठिकाणच महत्व ?

मुंबई : पेहलगाम हे जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील एक रम्य पर्यटनस्थळ. पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पहलगाम सध्या चर्चेत आले आहे. हे ठिकाणं केवळ निसर्गरम्य सौंदर्यामुळेच नव्हे तर धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळेही विशेष ओळखले जाते. ‘पहलगाम’ हे नाव ‘पुहेल’ (मेंढपाळ) आणि ‘गाम’ (गाव) या दोन काश्मिरी शब्दांपासून तयार झाले असून, त्याचा अर्थ होतो ‘मेंढपाळांचे गाव’. या शब्दातूनच या भागातील पारंपरिक जीवनशैली आणि नैसर्गिक सान्निध्य अधोरेखित होते.

निसर्गाचा अनुपम खजिना
पहलगाममध्ये दाट पाइनच्या जंगलांनी वेढलेली पर्वतश्रेणी, शुद्ध वारे, आणि नदीकाठच्या हिरव्या कुरणांची सौंदर्यता पाहणार्‍यांच्या मनावर खोल ठसा उमटवते. विशेषतः बैसरन व्हॅली, जी ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखली जाते, हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात. फक्त ५ किलोमीटर अंतरावर असलेली ही व्हॅली उन्हाळ्यात आल्हाददायक हवामान आणि हिवाळ्यात बर्फाच्छादित रूपात अनुभवता येते.

म्हणून आहे धार्मिक महत्व
अमरनाथ यात्रा ही भारतातील सर्वात पवित्र आणि कठीण धार्मिक यात्रांपैकी एक असून, तिचा प्रारंभ पहलगामपासून होतो. पहलगाम हे चंदनवारी या प्रारंभिक बिंदूपर्यंत पोहोचण्याचे प्रवेशद्वार आहे. पौराणिक कथांनुसार, भगवान शिवाने अमरनाथ गुहेत जाण्याआधी येथे पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते. त्या आधी त्यांनी अनेक ठिकाणी आपली प्रतीके सोडली – नंदीला पहलगाममध्ये, चंद्राला चंदनवारीत, नागाला शेषनाग तलावात आणि गणेशाला महागुण पर्वतावर. यामुळे या भागाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

असे असते हवामान
पहलगाममध्ये चार ऋतूंचा अनुभव घेतला जातो – उन्हाळा, शरद, हिवाळा आणि वसंत. उन्हाळ्यात तापमान २०-३० डिग्री सेल्सियसपर्यंत असते तर हिवाळ्यात हे उणे ४ डिग्रीपर्यंत खाली जाते. त्यामुळे वर्षभर येथे पर्यटक येत असले तरी, एप्रिल ते जून हा कालावधी पर्यटनासाठी सर्वाधिक आकर्षक मानला जातो


मुघल साम्राज्यापासून ते ब्रिटिश भारतापर्यंत, पहलगामने विविध कालखंडांचे साक्षीदार राहिले आहे. स्वातंत्र्यानंतर काश्मीर भारतात विलीन झाल्यावरही या भागाने आपली संस्कृती आणि परंपरा जपून ठेवली आहे. येथे अजूनही पारंपरिक बखरवाल समुदाय त्यांच्या गुरांसोबत वसंत ऋतूत पर्वतांमध्ये राहतात.

error: Content is protected !!