नाशिक । शिवसेना ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर यांची हकालपटटी करण्यात आल्यानंतर पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अशातच विलास शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शिंदेही पक्षाला सोडचिठठी देणार अशी चर्चा सुरू असतांनाच विलास शिंदे खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहेत.
त्यामुळे आता या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुधाकर बडगुजर यांनी आपली नाराजी व्यक्त करतांना विलास शिंदे यांच्यासह १० ते १२ जण पक्षात नाराज असल्याचे भाष्य केले होते. त्यानंतर बडगुजर यांची पक्षातून हकालपटटी करण्यात आली. अशातच विलास शिंदे यांच्या नाराजीची चर्चा सुरू असतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदेंच्या कौटुंबिक सोहळयाला हजेरी लावल्याने शिंदेंबाबत संशयाचे वलय निर्माण झाले.
इतकेच नव्हे तर आठवडाभरात विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांची दुसर्यांदा भेट घेतल्याने विलास शिंदेही शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडणार अशा चर्चा सुरू होत्या. याबाबत विलास शिंदे यांना विचारले असता आपण योग्य वेळी आपली भूमिका मांडू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याने याबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढला.
मात्र, आता विलास शिंदे यांनी बडगुजर यांच्यावरच तोफ डागली आहे. सर्व पदं बडगुजर यांना दिली जातात, इतर कार्यकर्त्यांना डावलले जाते, आम्ही अनेकदा नाराज होतो, पण कधी बोललो नाही. मात्र बडगुजर यांनी त्याबाबत भाष्य केले नाही असा आरोप शिंदे यांनी केला आहे.
राऊत यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे आणि पक्षातीलप्रमुख पदे मिळवणारे बडगुजर नाराज का आहेत ? असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला. दरम्यान आज होणार्या शिंदे-राऊत यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









