नाशिक । गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळून वाहनांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने गुरुवारी (दि. १५ मे) नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे, तर मागील तीन दिवसांपासून यलो अलर्ट देण्यात आला होता.
पावसाळ्यात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट हे शब्द वारंवार ऐकू येतात. पण हे अलर्ट म्हणजे नेमकं काय? त्याचा धोका किती असतो? आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेणं आवश्यक ठरतं.
रेड अलर्ट
सर्वात गंभीर इशारा
जेव्हा हवामान विभाग एखाद्या भागात अतिमुसळधार पावसाचा किंवा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवतो, तेव्हा रेड अलर्ट जारी केला जातो.
या इशार्याचा अर्थ – मोठ्या प्रमाणात पूर, दरड कोसळणे किंवा वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असते. अशा वेळी नागरिकांनी शक्यतो घरातच थांबावे, अनावश्यक प्रवास टाळावा, आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं.
ऑरेंज अलर्ट
सावधतेचा इशारा
ऑरेंज अलर्टचा अर्थ म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान अत्यंत अस्थिर असतं. या काळात नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता अधिक असते. या वेळी नागरिकांनी अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडावं, पुराचा धोका असलेल्या भागांपासून दूर राहावं, आणि लहान मुलं, वृद्ध यांची विशेष काळजी घ्यावी.
यलो अलर्ट
सावध राहण्याचा सल्ला
यलो अलर्ट म्हणजे हवामान सामान्य पेक्षा अस्थिर असण्याची शक्यता, पण धोका फार मोठा नसतो.
तरीही, या काळात नागरिकांनी सावधगिरी बाळगणे, स्थानिक हवामान अपडेट्स पाहणे आणि अनावश्यक धाडस टाळणे गरजेचे असते.
ग्रीन अलर्ट म्हणजे काय?
सर्व काही सामान्य
ग्रीन अलर्ट म्हणजे हवामान पूर्णपणे स्थिर असून कोणतीही विशेष सावधगिरी आवश्यक नाही. या काळात वाहतूक, शेती, आणि अन्य जनजीवन सुरळीत राहते.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
हवामान खात्याचे अपडेट्स नियमितपणे तपासावेत
नद्या, ओढे यांच्याजवळ जाऊ नये
अनावश्यक प्रवास टाळावा
छतं, झाडं, विजेच्या तारांपासून दूर राहावं
आपत्ती व्यवस्थापन किंवा प्रशासनाच्या सूचना तात्काळ पाळाव्यात







