काय सांगता ! दर वाढले तरी नाशिककरांची ‘इतक्या’ कोटींची सोने खरेदी

अक्षय तृतीयेला नाशिककरांचा ‘गोल्डन’ उत्साह कायम

नाशिक । अक्षय तृतीया हा शुभमुहूर्त मानून दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिककरांनी सोन्याच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली. विशेष म्हणजे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ९७ हजार ८५० रूपये इतका होता. मात्र असे असूनही नाशिककरांचा खरेदीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. सोन्याचे वाढते दरही नाशिककरांची आडवी आली नाहीत, उलट बाजारात खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला.

अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळपासूनच नाशिकमधील प्रमुख सराफ बाजार, कॉलेज रोड परिसरात सराफी पेढयांवर ग्राहकांची गर्दी दिसून आली. पारंपरिक दागिन्यांपासून ट्रेंडी डिझाइन्सपर्यंत सर्वच प्रकारांचे दागिने खरेदीसाठी नागरिकांची पसंती होती. अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्याची जुनी परंपरा असून आजही भारतीय नागरिक अक्षय्य तृतीयेला सोनं-चांदीची खरेदी करतात. सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. जवळपास १ लाख रुपयांजवळ सोन्याचा भाव पोहोचला आहे. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅमला जीएसटी सह ९७ हजार ८५० रूपये इतका भाव होता तर २२ कॅरेटला जीएसटीसह प्रति १० ग्रॅमचा भाव ९० हजार ७८० रूपये इतका होता. चांदी १ लाख १५ हजार रूपये किलो इतका भाव होता

सराफ व्यापार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दर जास्त असतानाही ग्राहकांनी खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दर वाढले असले तरी अक्षय तृतीया एकदा येते, त्यामुळे शुभक्षण वाया जाऊ द्यायचा नाही, असे मत अनेक ग्राहकांनी व्यक्त केले. नाशिकच्या सराफा बाजारात अक्षय तृतीयेच्या मुर्हूतावर तब्बल २० कोटींहून अधिक सोन्याची विक्री झाल्याचे सांगितले जाते. सोने, चांदीचे भाव वाढले असले तरी ग्राहकांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झाला नाही.

नवदांपत्य आणि गृहिणींनी दिला खरेदीला जोर
लग्नसराई सुरू असल्याने नवदांपत्यांनी सोन्याच्या खरेदीस विशेष प्राधान्य दिले, तसेच गृहिणींनीही आपल्या पसंतीनुसार चेन, बांगड्या, कानातील दागिने, रिंग, नथ, मंगळसूत्र खरेदी केली. काही ठिकाणी ‘बुकिंग करून ठेवलेली’ खरेदीही आज पूर्ण करण्यात आली.

सोन्याबरोबर चांदीलाही मागणी
सोन्याबरोबरच चांदीच्या वस्तूंनाही चांगली मागणी दिसून आली. पूजेसाठी चांदीची पातेली, तबकं, पंचपात्र यासारख्या वस्तूंसह नाण्यांचीही मोठी विक्री झाली.

शुभ दिवस’ हीच खरेदीमागची प्रेरणा
अक्षय तृतीया म्हणजे शुभ दिवस अशी धारणा असून, या दिवशी केलेली खरेदी अक्षय म्हणजे न संपणारी मानली जाते. त्यामुळे दर वाढले असले तरी नाशिककरांनी भावनिक आणि पारंपरिक मूल्यांना अधिक महत्त्व दिले, असे स्पष्ट झाले आहे.

error: Content is protected !!