नाशिक । एकीकडे उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरीक त्रस्त असतानाच, दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तापमानात चढ-उतार, पावसाचा धोका
जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. यामुळे उकाडा प्रचंड वाढला असून नागरिकांना त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पुणे जिल्ह्यातही हवामान अंशतः ढगाळ राहील, तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वार्यांची हालचाल
हवामान विभागानुसार, देशातील मध्य प्रदेशपासून महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक आणि तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यासोबतच मध्य प्रदेश व समुद्रसपाटीपासून सुमारे ९०० मीटर उंचीवर चक्राकार वार्यांची हालचालही नोंदवण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पूरक हवामान परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा : सिन्नर, येवल्यात अवकाळीचा तडाखा, १३ हेक्टरचे नुकसान.
गारपीट आणि वादळी पावसाचा धोका कायम
या हवामान बदलामुळे अनेक भागांत वादळी वार्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकरी वर्ग आणि जनतेने काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर असे बदलते हवामान शेती, जनजीवन आणि आरोग्यावरही परिणाम करणारे ठरू शकते.
सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानात चढ-उतार दिसत असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.










