नाशिक । जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिक महानगर शाखेने आज अशोकस्तंभ येथे जोरदार निदर्शने केली. भारत माता की जय, वंदे मातरम, “आतंकवाद नहीं सहेंगे” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
या निदर्शनात विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परिषदेकडून सांगण्यात आले की, पहेलगाम येथे पर्यटकांच्या धर्माची चौकशी करून जाणीवपूर्वक गोळीबार करण्यात आला, ही घटना अत्यंत निंदनीय असून, भारतातील नागरिक हे अशा इस्लामिक दहशतवादाला कधीच झुकणार नाहीत. प्रदेश सहमंत्री व महानगर मंत्री ओम मालुंजकर यांनी या वेळी केंद्र सरकारकडे मागणी केली की, या पाकपुरस्कृत दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने पूर्वी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून उत्तर दिले होते, त्याच धर्तीवर या हल्ल्याला ठोस प्रत्युत्तर देण्यात यावे,”अशी भूमिका त्यांनी मांडली.
या निदर्शनात प्रदेश सहमंत्री मेघा शिरगावे, महानगर सहमंत्री पियुषा हिंगमिरे, अक्षता देशपांडे, व्यंकटेश औसरकर, तसेच विविध नगर विभागाचे मंत्री आणि कार्यकर्ते – योगेश महाजन, मोनाली महाजन, सार्थक आहेर, शुभम कुलकर्णी, आणि अश्विनी राठोड आदी सहभागी झाले होते.
कार्यकर्त्यांनी हातात झेंडे, फलक घेत देशविरोधी कारवायांचा निषेध व्यक्त केला. आम्ही भारतीय आहोत, शांततेचे पुजारी आहोत, पण देशविरोधी कारवाया सहन करणार नाही, असा ठाम निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.











