युद्ध फक्त स्थगित, थांबलेलं नाही” – पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला चेतावणी ; काय म्हणाले मोदी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधताना पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला – “युद्ध थांबलेलं नाही, फक्त स्थगित केलं आहे.” ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत त्यांनी देशवासीयांना माहिती दिली आणि भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाला सलाम केला.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत, पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या कारवाईचं वर्णन केलं. ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक सैनिकी कारवाई नव्हे, तर देशाच्या कोटी कोटी जनतेच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. आम्ही केवळ दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर त्यांच्या इच्छाशक्तीवरही प्रहार केला आहे, असं मोदी म्हणाले.

दहशतवाद्यांना ‘स्वप्नातही’ कल्पना नव्हती

६ मे च्या रात्री आणि ७ मे च्या सकाळी भारताने घेतलेला निर्णय दहशतवाद्यांना स्वप्नातही सुचला नसेल. पण जेव्हा भारत एकजूट होतो, ‘भारत प्रथम’ची भावना जागी होते, तेव्हा हे अशक्यही शक्य होतं, असं सांगत त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचे कौतुक केलं.

दहशतवाद आणि चर्चा एकत्र शक्य नाही

पाकिस्तान आणि रक्त, टेरर आणि टॉक – हे एकाचवेळी शक्य नाही, असं स्पष्ट करत, त्यांनी पाकिस्तानसोबत कोणत्याही स्वरूपातील चर्चेचा मार्ग बंद असल्याचं स्पष्ट केलं. पाकिस्तानसोबत केवळ दहशतवाद आणि पीओके यावरच चर्चा होईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

न्यूक्लिअर धमक्यांवर भारताचं सडेतोड उत्तर

भारत न्यूक्लिअर ब्लॅकमेलला भीक घालणार नाही. निर्णय घेताना भारत अजिबात मागे हटणार नाही. दहशतवाद्यांना पाठिंबा देणार्‍या सरकारांना वेगळं पाहिलं जाईल, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला अंतिम इशारा दिला.

ऑपरेशन सिंदूर : निर्णायक कारवाई

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करत १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला. या कारवाईत पाकिस्तानच्या लष्कराचे दहशतवाद्यांना सलामी देणं हे जगासाठी धक्कादायक आहे. पाकिस्तान हा ग्लोबल अतिरेक्यांचं विद्यापीठ बनला आहे, अशी कठोर टीकाही त्यांनी केली.

जनतेशी थेट संवादातून स्पष्ट संदेश

मोदींचा हा भाषणाचा सूर केवळ घोषणात्मक नव्हता, तर निर्णायक कारवाईची मानसिकता दर्शवणारा होता. या कारवाईने आमच्या आया-बहिणींच्या कुकूंचं उत्तर दिलं आहे, असे म्हणत त्यांनी देशातील महिलांप्रती आदर व्यक्त केला. या भाषणातून भारताची सुरक्षा धोरणं, सैन्य दलाला दिलेली मोकळीक आणि पाकिस्तानविरोधातील भविष्यातील धोरणाचा स्पष्ट संकेत मिळतो. युद्ध थांबलं असलं, तरी संघर्षाचा अध्याय पूर्ण संपलेला नाही – हा संदेश पंतप्रधानांनी ठामपणे दिला आहे.

error: Content is protected !!