नाशिक । पेठ तालुक्यातील मौजे बोरीचीबारी गावात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. याच टंचाईच्या पार्श्वभूमीवर एका महिलेने पाण्यासाठी विहीरीत उतरल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडीओमुळे खळबळ उडाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत आज तहसीलदार व गटविकास अधिकारी, पेठ यांनी संयुक्त भेट देवून परिस्थितीचा पंचनामा व स्थळनिरीक्षण केले.
बोरीचीबारी येथील ५५४ लोकसंख्येसाठी एप्रिल ते जून या टप्प्यात विहीर अधिग्रहणाची योजना होती. मागील वर्षीही अशाच परिस्थितीत अधिग्रहण करून विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाही १७ एप्रिलपासून खाजगी टँकरद्वारे सार्वजनिक विहिरीत पाणी टाकले जात होते, मात्र त्यातून बादलीने (शेंदून) पाणी काढावे लागत असल्याने महिलांना जीव धोक्यात घालून विहीरीत उतरावे लागत होते.
२१ एप्रिल रोजी प्रशासनाने गावात भेट देत पाणीटंचाईचा आढावा घेतला. बोरीचीबारी येथे दोन वर्षांपूर्वी स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली होती. मात्र सध्या ती योजना बंद आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने खाजगी टँकरच्या मदतीने सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरवठा सुरू केला होता.
२० एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ गावातील आंतरिक मतभेदातून त्रयस्थ व्यक्तीने अपलोड केल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. विशेष म्हणजे, ज्या विहीरीतील व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्या विहीरीचा पाणीपुरवठ्यासाठी वापर होत नव्हता आणि तिच्यात पाणीही अत्यल्प प्रमाणात असल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
एका महिलेस पाणी घेण्यासाठी विहीरीत उतरवून व्हिडीओ तयार करून समाज माध्यमांवर कोणीतरी त्रयस्थ व्यक्तीने प्रसिध्द केला असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ज्या विहिरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्या विहीरीचे पाणी वापरले जात नसून त्या विहीरीला अत्यल्प पाणी दिसून येते. आज ग्रामपंचायत मार्फत विहीर अधिग्रहणचा प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. विहिर अधिग्रहण प्रस्ताव मान्यता मिळेपर्यंत ग्रामपंचायत बोरीचीबारी यांनी स्वखर्चाने पुरेसा पाणी पुरवठा करणार असून सार्वजनिक विहिरीत ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे पाणी न टाकता ग्रामस्थांच्या घरासमोरील ड्रममध्ये ठिक ठिकाणी टँकरद्वारे पाणी वाटप सुरू केले आहे.











