अवकाळीचा तडाखा ; १०८२ घरांचे नूकसान, ७५ जनावरांचा मृत्यू

नाशिक । जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून या पावसामूळे आतापर्यंत लहान मोठ्या ७५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात तब्बल १ हजार ८२ घरांची कमी अधिक प्रमाणात पडझड झाली असून रस्ते, पूलांसारख्या नऊ सार्वजनिक मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ६ मे पासून अवकाळी पावसाला सुरूवात झाली. काही ठिकाणी तर गारपीट देखील झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात कोसळणार्‍या बेमोसमी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर विजा पडून मनूष्यहानीबरोबरच जनावरांची देखील मोठी जीवीतहानी झाली आहे.

६ मे ते २० मे या १५ दिवसांच्या कालावधीत दुध देणार्‍या १७ गायींचा वीज पडून मृत्यू झाला आहे. या कालावधीत २८ शेळ्या आणि २९ बैलांनी अवकाळी पावसामूळे जीव गमावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दिंडोरी, निफाड, सिन्नर, देवळा, मालेगाव, नांदगाव, कळवण आणि बागलाण या तालुक्यांमध्ये पशुधनाची अधिक जीवीतहानी झाली आहे.

ग्रामीण भागात या पावसाने कच्च्या आणि पक्क्या घरांची मोठी पडझड झाली आहे. जिल्ह्यात ६८९ कच्च्या घरांची पडझड झाली आहे. सहा कच्ची घरे पूर्णत: पडली आहेत. याशिवाय ३८६ पक्क्या घरांची अंशत: पडझड झाली असून एका घराची पूर्णत: पडझड झाली आहे.

या पावसाने १६ गोठे नष्ट केले असून त्र्यंबकेश्वर, बागलाण आणि सुरगाण्यात रस्ते, पूल अशा नऊ सार्वजनिक मालमत्तांची बेमोसमी पावसामूळे मोठी हानी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

error: Content is protected !!