नाशिक : नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या द्वारका चौकात अंडरपास उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवार (दि. २१) रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
वाहतूक बेट हटवून अंडरपासचा मार्ग
द्वारका सर्कलवर गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड वाहतूक कोंडी जाणवली जात असून, यासमाधान मिळवण्यासाठी अंडरपास हा ठोस उपाय असल्याचे ठरवण्यात आले आहे. नाशिकहून नाशिकरोडकडे जाणाऱ्या मार्गावर ८०० मीटर लांबीचा अंडरपास तयार करण्यात येणार आहे. या अंडरपासद्वारे हलक्या वाहनांची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
याच मुख्य मार्गास धुळ्याकडे जाणारी वाहतूकही जोडली जाणार असून, त्यासाठी वडाळानाका येथे आणखी एक ३०० मीटरचा अंडरपास विकसित केला जाणार आहे. त्यामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
पोलिसांना प्रशिक्षणाची गरज
पाहणी दरम्यान मंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अंडरपास उभारणीसाठी सर्व बाबींचा सखोल अभ्यास करण्याचे निर्देश दिले. कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करणे आणि वाहतूक पोलिसांना विशेष प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
या पाहणीवेळी पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व किरणकुमार चव्हाण, मनपाचे वाहतूक सेलचे अभियंता रवींद्र बागुल, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खैरे, अॅड. रवींद्र पगार, अंबादास खैरे आणि इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
द्वारका चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सिग्नलच्या पुढे वाहने अडवावीत. प्रशिक्षण दिल्यास ही स्थिती सुधारता येईल. अंडरपासचा प्रकल्प याच उद्दिष्टासाठी पाहणीस घेतला आहे.”
– छगन भुजबळ, मंत्री, महाराष्ट्र राज्य











