पीएम आवास योजनेत १६ हजार कुटूंबांना मिळाले हक्काचे घर

नाशिक । नाशिक जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्य शासनाच्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात ठरवलेल्या उद्दिष्टांच्या पार्श्वभूमीवर अतुलनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्याने १३,५४३ घरकुलांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल १६,९६० घरकुलांचे निर्माण पूर्ण करून १२५ टक्के उद्दिष्टपूर्ती साधली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी नाशिक जिल्ह्याला राज्यातील घरकुल पूर्णतेच्या मोहिमेमध्ये अव्वल स्थानावर घेऊन गेली आहे.


मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसीय कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती. त्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी नाशिक जिल्ह्याने केवळ प्रयत्नच केले नाहीत, तर उद्दिष्टांच्या पलीकडे जाऊन हजारो कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून दिले. ही कामगिरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, नाशिक यांच्या समन्वय, नेतृत्व व संघटित प्रयत्नांचे फलित आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील सर्व घटकांचे शासन स्तरावरून विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देताना प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी सांगितले की, ही कामगिरी हे सामूहिक प्रयत्नाचे उदाहरण आहे. स्थानिक प्रशासन, अभियंते, ग्रामपंचायती व लाभार्थी यांचे योगदान मोलाचे ठरले.

नाशिक जिल्ह्याच्या सर्व विकास अधिकार्‍यांनी, गटविकास अधिकार्‍यांनी आणि ग्रामपंचायतींनी ग्रामीण भागातील गरजू नागरिकांपर्यंत घरकुल योजना प्रभावीपणे पोहोचवली असून संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.

  • आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.नाशिक
error: Content is protected !!