नाशिकच्या औद्योगिक प्रगतीला गती : या दोन कंपन्या करणार 5500 कोटींची गुंतवणूक

नाशिक । महाराष्ट्र शासनाने औद्योगिक गुंतवणुकीला चालना देत नाशिक जिल्ह्यातील दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी सामंजस्य करार (MoU) केले आहेत. या गुंतवणुकीमुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.

ग्राफाइट इंडिया लि. या आघाडीच्या कंपनीसोबत झालेल्या करारानुसार इगतपुरी तालुक्यातील गोंदे/मुंधेगाव येथे ₹4761 कोटींच्या खर्चाने सिंथेटिक ग्राफाइट अ‍ॅनोड मटेरियल (SGAM) प्रकल्प उभारला जाणार आहे. हा अत्याधुनिक प्रकल्प लिथियम-आयन बॅटरी निर्मितीसाठी महत्त्वाचा ठरणार असून एकूण 1166 रोजगाराच्या संधी (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष) उपलब्ध करणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा ग्रीन एनर्जी व बॅटरी उत्पादन क्षेत्रात महत्वाची ओळख निर्माण करेल.

दरम्यान, व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. या कंपनीसोबत करण्यात आलेल्या करारानुसार दिंडोरी येथे ₹800 कोटींच्या खर्चाने इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोलर्स, कंप्रेसर मोटर्स तसेच एसी व वॉशिंग मशीनसाठी आवश्यक घटक उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीमुळे 500 रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

या दोन्ही प्रकल्पांमुळे एकूण 5,500 कोटींपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक नाशिक जिल्ह्यात होणार असून, 1,600 हून अधिक तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. यामुळे नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील मॅन्युफॅक्चरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून आणखी बळकट होणार आहे.

error: Content is protected !!