त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्तांवर गुन्हा दाखल करा, पुरातत्वच पत्र काय आहे प्रकरण ?

त्र्यंबकेश्वर | त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाविरोधात गंभीर आरोप करत भारतीय पुरातत्त्व खात्याने थेट त्र्यंबकेश्वर पोलिसांकडे पत्रव्यवहार केला आहे. मंदिराच्या आवारात प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्याच्या प्रकरणावरून विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सदर प्रकरणात पुरातत्त्व खात्याने स्पष्ट केले आहे की, त्र्यंबकेश्वर मंदिर हे ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले असून, अशा ठिकाणी कोणताही व्यावसायिक उपक्रम चालवणे हे कायद्याने गुन्हा आहे. देवस्थान ट्रस्टकडून मंदिराच्या आवारात लाडू विक्री करून पुरातत्त्व खात्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

माजी विश्वस्तांकडून या विक्रीविरोधात तक्रार करण्यात आल्यावर खात्याने चौकशी करून पोलिसांना पत्र पाठवले आहे. कायद्यानुसार, अशा उल्लंघनासाठी १ लाख रुपयांचा दंड किंवा दोन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुरातत्त्व खात्याच्या या कारवाईने त्र्यंबकेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली असून, विश्वस्त मंडळ किंवा पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

error: Content is protected !!