मीरा भाईंदर मध्ये मनसेचा राडा, पोलिसांकडून मनसे नेत्यांची धरपकड

मीरा-भाईंदरमध्ये मराठी मोर्चा पेटला

मुंबई । मीरा-भाईंदर परिसरात आज मराठी माणसाच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चा आयोजित करण्यात आला होता. अमराठी व्यापार्‍यांच्या वाढत्या दादागिरीविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असून, मोर्चापूर्वीच मनसेच्या नेत्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता, पोलीस फौजफाट्यासह ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेण्यात आलं. याआधीच त्यांना नोटीस देण्यात आली होती, पण ते मोर्चात सहभागी होण्यावर ठाम होते. त्यांनी मराठी बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं. सध्या जाधव यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

या घटनेनंतर मनसे नेते प्रकाश महाजन आणि सरचिटणीस वैभव खेडेकर हे खेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत. राज्य सरकार दडपशाही करत आहे. अविनाश जाधव यांना तात्काळ सोडावं,अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. प्रकाश महाजन यांनी जाहीर केलं की ते शासनाच्या अन्यायकारक वागणुकीविरोधात शांततामय मार्गाने आंदोलन करत राहतील.

या कारवाईचा व्याप केवळ एका नेत्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. मीरा रोडवर होणार्‍या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, वसई-विरार परिसरातील मनसेच्या अनेक पदाधिकार्‍यांना पहाटे तीनच्या सुमारास घरातून उचलून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. यात जयेंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील, राकेश वैती, प्रवीण भोईर, विनोद मोरे, संजय मेहरा, दिलीप नेवाळे, कल्पेश रायकर आणि पांडुरंग लोखंडे यांचाही समावेश आहे.

पोलिसांकडून कारवाई, कलम १४४ लागू
मीरा-भाईंदर शहरात मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये, रेल्वे स्थानकांवर तसेच प्रमुख जंक्शन परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. काल (सोमवार) शहरात रूट मार्चही काढण्यात आला होता, अशी माहिती मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी सांगितले की, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली असून कोणीही त्या ठिकाणी येऊ नये. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली असून, बेकायदेशीर कृत्य करण्याचा संशय असलेल्या काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.

शिंदे यांनी पुढे म्हटलं, “नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. पोलिसांनी ज्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे, त्या ठिकाणी नागरिकांना जमण्याचे आवाहन करणे हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. अशा प्रकारे अपप्रेरणा देणार्‍या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. पोलीस विभागाने कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

error: Content is protected !!