पंचवटी । बिडी कामगार नगर परिसरातील तीन अल्पवयीन मुले रविवारी (दि. २९) पासून बेपत्ता होती. सोमवारी (दि. ३०) सकाळी अमृतधाम लिंकरोडवरील ‘दी व्ही पार्क’ या बांधकाम साईटवरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.
साई गोरख गरड (वय १४), साई हिलाल जाधव (वय १४) आणि साई केदारनाथ उगले (वय १३) अशी या मृत बालकांची नावे आहेत. शोधमोहीमेदरम्यान घटनास्थळी त्यांचे कपडे सापडल्याने पोलिसांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने पाण्यात शोध घेतला. बोटीच्या साहाय्याने शोधकार्य राबवून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मुलांच्या मृत्यूला बांधकाम साईटवर योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याचे कारण समोर आले आहे.
गुन्हा दाखल:
या प्रकरणी दी व्ही पार्कचे व्यावसायिक विजय शिखालीया आणि ठेकेदार आकाश गायकवाड यांच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
माजी नगरसेविका पुनम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत रस्तारोको केला. दोषींवर कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली.
साई गरड आणि साई जाधव हे आदर्श शाळेत तर साई उगले बिटको हायस्कूलमध्ये शिकत होते. साई जाधव हा दत्तक घेतलेला होता, तर साई गरड हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. साई उगले याला एक बहीण व भाऊ आहेत.








