हे युद्ध धर्माविरोधात नाही, दहशतवादाविरोधात आहे ः भुजबळ

नाशिक । भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या निर्णायक कारवाईवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हे युद्ध कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर दहशतवादाविरोधात पुकारले गेले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन करत देशातील जनतेला एकतेचा संदेश दिला.

भुजबळ म्हणाले, पाकिस्तानातील अतिरेकी तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रत्येक भारतीयाचा मान अभिमानाने उंचावला आहे. आपल्या महिलांचे कुंकू पुसणार्‍यांना आज उत्तर देण्यात आले आहे. हे अजून संपलेलं नाही, त्यामुळे देशवासीयांनी सज्ज राहणं आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, लष्कराने स्पष्ट केलं आहे की, कारवाईत एकाही सामान्य नागरिकाला इजा झाली नाही. फक्त अतिरेकी आणि त्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. अमेरिका देखील पाकिस्तानला उत्तर देऊ नका असा इशारा देत भारताच्या भूमिकेचा पाठिंबा दर्शवतो आहे.

राष्ट्रीय एकतेचा संदेश
छगन भुजबळ यांनी नागरिकांना ब्लॅकआउटसारख्या सुरक्षात्मक उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले. १९७१ नंतर आता पुन्हा सायरन वाजण्याची वेळ आली आहे. आपण आपल्या देशात एकतेची भावना ठेवली पाहिजे. विरोधकही यावेळी एकदिलाने सरकारच्या भूमिकेचं समर्थन करत आहेत.

इतिहासाची पुनरावृत्ती
भुजबळ यांनी इंदिरा गांधींच्या कार्यशैलीची आठवण करून देत सांगितले की, इंदिरा गांधी यांनी कारवाईपूर्वी संपूर्ण देशाला विश्वासात घेतलं होतं, त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी देखील आता सर्वपक्षीय सहमती घेऊन निर्णय घेतला आहे. पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यांवर ही प्रतिक्रिया योग्यच आहे. अनेक देशांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण असले तरी, भुजबळांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि भारतीय लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा सल्ला दिला आहे.

error: Content is protected !!