मुंबई । सध्या सोशल मीडियावर ग्रामीण भागातील मराठी गायकांची गाणी अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. विशेषतः अहिराणी गायक सचिन कुमावत याचे ‘रस प्यायला ये म्हणलं माय’ आणि लोकप्रिय गायक संजू राठोड याचे ‘एक नंबर तुझी कंबर’ ही दोन गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, यूट्यूबवर देखील यांचा बोलबाला पाहायला मिळतोय.
सचिन कुमावतने तृतीयपंथीयांना संधी देत सादर केलेले ‘रस प्यायला ये म्हणलं माय’ हे गाणं केवळ सोशल मीडियावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात झळकले आहे. यापूर्वी ‘केसावर फुगे’ सारख्या गाण्यांनी लोकप्रियता मिळवलेल्या कुमावतने पुन्हा एकदा रसिकांची मने जिंकली आहेत.
दुसरीकडे, ‘गुलाबी साडी’, ‘नको मला बंगला नको’ यासारख्या हिट गाण्यांनंतर संजू राठोडचं ‘एक नंबर तुझी कंबर’ हे गाणं म्हणजेच Shaky, हे देखील चांगलेच गाजत आहे.
कोणाचे गाणे आघाडीवर?
यूट्यूबवरील आकडेवारीनुसार, संजू राठोडचे ‘एक नंबर तुझी कंबर’ हे गाणे सध्या व्ह्यूजच्या बाबतीत आघाडीवर आहे.
‘एक नंबर तुझी कंबर’ (Shaky) – रिलीज: 22 एप्रिल 2025, यूट्यूब व्ह्यूज: 13,807,227
‘रस प्यायला ये म्हणलं माय’ – रिलीज: 23 एप्रिल 2025, यूट्यूब व्ह्यूज: 11,279,386
म्हणजेच, यूट्यूबवर सध्या तरी संजू राठोडचे गाणे काही लाख व्ह्यूजनी पुढे आहे. मात्र, दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात ही गाणी तितक्याच जोशात वाजवली जात आहेत. सोशल मीडियाच्या जोरावर ग्रामीण भागातील कलाकारांचे गाणे राज्याच्या कानाकोपर्यात पोहोचत असून, प्रेक्षक त्यांच्या कलेला भरभरून प्रतिसाद देत आहेत हे विशेष!











