नाशिकमध्ये येणार मोठा प्रकल्प ; दरवर्षी दोन हजार तरुणांना मिळणार रोजगार

नाशिक । नाशिकच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सिपेट (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग) प्रकल्प नाशिकमध्ये लवकरच सुरू व्हावा यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पाठपुरावा केला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून खासदार वाजे यांनी नुकतीच संभाजीनगर येथील सिपेट संस्थेला सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान खासदार वाजे यांनी सिपेटचे कामकाज कसे चालते, याबाबतची सविस्तर माहिती घेतली. सिपेट नाशिकमध्ये सुरू झाल्यावर नाशिकच्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी कसा फायदा होईल, तसेच प्लास्टिक उत्पादन आणि संबंधित उद्योगांना याचा कसा लाभ मिळेल, याची त्यांनी पाहणी केली. सिपेट संस्थेचे प्रमुख आणि संचालक यांनी त्यांना प्रकल्पाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये सिपेट प्रकल्पासाठी जागा मिळवण्यावरून मतमतांतरे होती. हा विषय मार्गी लागावा यासाठी खासदार वाजे यांनी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, काही दिवसांपूर्वीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे सिपेटसाठी १० एकर जागा देण्याची घोषणा केली आहे. सध्या या प्रकल्पाची फाईल महसूल मंत्रालयाकडून कौशल्य विकास मंत्रालयात आली आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी देखील खासदार वाजे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असून लवकरच सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन प्रकल्प उभारणीला सुरवात होण्याची आशा आहे.

नाशिकमध्ये सिपेट इन्स्टिट्यूटची लवकर स्थापना व्हावी यासाठी खासदार वाजे लवकरच केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. याआधीही त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्रीय सचिव निवेदिता शुक्ला यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या प्रकल्पामुळे नाशिकमधील तरुण पिढीला प्लास्टिक निर्मितीचे आधुनिक शिक्षण मिळेल आणि स्थानिक उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली.

खासदार झाल्यापासून या प्रकल्पासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हा प्रकल्प नाशिकच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार असून हजारो तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत
राजाभाऊ वाजे,खासदार

error: Content is protected !!