नाशिक । नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग पुर्णपणे खुला झाल्याने आता या महामार्गावर वाहनांची संख्या देखील वाढली आहे. महामार्गाचे उदघाटन झाल्यानंतर पहिल्या दिवशी २४ तासांत या महामार्गावरून तब्बल ३८ हजार ९८७ वाहनांनी प्रवास केला यात ५ हजार वाहने इगतपुरी ते आमणे या टप्प्यावरून धावल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाशिक जिल्हयातील इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटरच्या महामार्गाचे उदघाटन ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे आता ७०१ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग पुणेपणे वाहतूकीसाठी खुला झाला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार नागपूर इगतपुरी दरम्यान अडीच वर्षात म्हणजे १ जून २०२५ पर्यंत २ कोटी ११ लाख ३४ हजार ३२२ वाहनांनी प्रवास केला. या वाहनधारकांकडून टोलच्या माध्यमातून १५३० कोटी रूपयांचा महसूल प्राप्त झाला.
इगतपुरी ते आमणे महामार्ग खुला झाल्यानंतर पहिल्या दिवशी प्रवासी संख्येत चांगली वाढ झाली आहे. नागपूर इगतपुरी दरम्यान दिवसाला अंदाजे ३२ हजार वाहने धावत होती. आता यात वाढ झाली आहे. उदघाटनानंतर सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत समृध्दीवरून ३०५ वाहनांनी प्रवास केला यातून ४४ हजार रूपये महसूल प्राप्त झाला. तर गुरूवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ या २४ तासांत नागपुर आमणे, ठाणे दरम्यान ३८ हजार ९८७ वाहनांनी प्रवास केला. या वाहनांकडून २ लाख ९८ हजार ९० रूपये टोल वसूल करण्यात आला. आमणे पर्यंत प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या ४४७६ होती.











