नाशिक । आम्ही अमेरिकेत, जपानमध्ये जमीन घेतली नाही. ना शक्तीपीठ, ना समृद्धीलगत जमिनी घेतल्या. शेतमालाला भाव नसल्यामुळेच आमच्यावर कर्ज झाले हे सरकारचे पाप आहे, असे म्हणत शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या मुददयावर महाराष्ट्रात एक मोठे आंदोलन उभे करू, हे आंदोलन असे असेल की, सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावरून फिरणे मुश्किल करू असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.
पुढील १५ दिवसांत राज्यभर दौरा करून शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांद्याला हमीभाव अशा ज्वलंत मुद्द्यांवर रणनिती ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आंदोलन हे यंदा पारंपरिक पद्धतीने न होता गनिमी काव्याने राबवले जाईल, असे सांगून तुपकर म्हणाले, मंत्र्यांना राज्यात रस्त्यावर फिरणे मुश्किल करू. उद्या परभणी आणि बीड जिल्ह्यात सभा होतील, तर मे अखेरीस तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
खोटी आश्वासने, फसलेली कर्जमाफी
सत्तेवर येताना सरकारने ‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन दिले. जर कर्जमाफी शक्य नव्हती, तर ती आश्वासने का दिली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकर्यांच्या आत्महत्या दररोज वाढत असून, रोज १० शेतकरी मृत्यू पत्करत आहेत, याची कबुली खुद्द कॅबिनेट मंत्र्यांनी दिली आहे, असे त्यांनी नमूद केले.
नेत्यांची मालमत्ता जप्त करा
एनडीसीसी बँक शेतकर्यांच्या नावाने सातबार्यावर बोजा चढवत आहे. मात्र त्याच बँकेच्या माध्यमातून नेत्यांनी संपत्ती उभारली आहे. शेतकर्यांवर कारवाई करण्याआधी नेत्यांच्या मालमत्ता जप्त करा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. उद्योगपतींच्या १० लाख कोटींची कर्जमाफी होते, पण निसर्गाच्या कोपाने कर्जबाजारी झालेल्या शेतकर्यांना मदत दिली जात नाही, हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप त्यांनी केला.
कांद्याला हमीभाव द्यावा
कांद्याला त्वरित हमीभाव द्या आणि अनुदान जाहीर करा, अशी मागणी करत द्राक्ष उत्पादक शेतकर्यांच्या फसवणुकीवर कठोर कायदा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्वार्थी नेतृत्वाला शेतकरी नाकारतील
शेतकरी संघटनांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, ज्यांना फक्त स्वतःची खासदारकी दिसते, त्यांच्या मागे आम्ही जाणार नाही. राजू शेट्टींवर नाव न घेता टिका करत ते म्हणाले, नवीन तरुण नेतृत्व पुढे येण्यास उत्सुक आहे, पण स्वार्थी लोक त्यांना पुढे येऊ देत नाहीत अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.










