आदिवासी उत्पादकांना जागतिक बाजारपेठेचे दार होणार खुले

नाशिक । आदिवासी शेतकरी बांधवांच्या प्रिमियम उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘आदी-शबरी फेडरेशन’ला केंद्रीय कॉर्पोरेट मंत्रालयाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळाल्याने शबरी नॅचरल्स ब्रँडच्या विस्ताराला मोठा बळ मिळणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या पुढाकाराने आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संघटन करीत ‘आदी-शबरी’ हे फेडरेशन स्थापन करण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे ५० आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्या या फेडरेशनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या असून, आता या संघटनेमार्फत शबरी नॅचरल्स ब्रँडच्या उत्पादनांची निर्मिती, विक्री आणि निर्णय प्रक्रिया हाताळली जाणार आहे.

ब्रँडला सर्वतोपरी शासकीय मान्यता
शबरी नॅचरल्स ब्रँडला यापूर्वीच गुणवत्ता, मोजमाप, प्रक्रिया यंत्रणा यांची प्रमाणपत्रे मिळाली आहेत. तसेच भारत सरकारच्या एमएसएमई (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) मंत्रालयाच्या उद्यम नोंदणी प्रमाणपत्रानेही नोंदणीकृत ब्रँड अधिकृतरित्या ओळख प्राप्त झालेली आहे. आता ‘आदी-शबरी’ फेडरेशनला मिळालेल्या मान्यतेमुळे शबरी नॅचरल्स ब्रँडचा स्वायत्त विकास व जागतिक बाजारपेठेतील प्रवेश सुलभ होणार आहे.

महामंडळ सहायक भूमिकेत
‘आदी-शबरी’ फेडरेशनला शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ सहायक संस्थेप्रमाणे पाठबळ देणार असून, सगळे धोरणात्मक निर्णय फेडरेशनकडून घेतले जातील. यामुळे आदिवासी उत्पादक स्वतःच्या मालकी हक्कासह उत्पादन व्यवस्थापनात सहभागी होतील, हे या योजनेचे वैशिष्ट्य ठरणार आहे.आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी बांधवांचे जीवनमान, त्यांची संस्कृती जपणे यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात. त्यासाठी शबरी नॅचरल्स हा एकछत्री ब्रँड तयार करण्यात आला आहे. या ब्रँडला सर्वतोपरी शासकीय मान्यता मिळाल्या आहेत. आदि-शबरी फेडरेशनला मान्यता मिळाली असून लवकरच त्याकडे हस्तांतर होणार आहे.

  • लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग
    व्यवस्थापकीय संचालक, आदिवासीविकासमहामंडळ
error: Content is protected !!