ठाकरे गटाचा संताप; राहुल गांधी नाशिकला आल्यास काळं फासणार

नाशिक । स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अपशब्द वापरणार्‍या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत ठाकरे गटाचे नेते व नाशिकचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांनी थेट धमकीवजा इशारा दिला आहे. राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासू, नाही जमले तर दगडफेक करू, असे दराडे यांनी म्हटले असून त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

दराडे म्हणाले, आम्ही सावरकरांच्या जन्मभूमीत राहतो, याचा आम्हाला अभिमान आहे. सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी जे काही विधान केले, ते अपमानास्पद होते. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी एबीपी माझाशी बोलताना हे वक्तव्य केले.

जरी आम्ही महाविकास आघाडीचा भाग असलो तरी राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे समर्थन करणं आमच्यासाठी अशक्य आहे. सावरकरांविषयी कोणीही अपशब्द वापरला, तर आम्ही गप्प बसणार नाही. महाविकास आघाडी खड्ड्यात गेली तरी चालेल, पण सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका दराडे यांनी मांडली.

दराडे यांच्या या विधानामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे ठाकरे गट महाविकास आघाडीत असूनही राहुल गांधींविरोधात अशा प्रकारची उघडपणे आक्रमक भूमिका घेतल्यामुळे, आघाडीतील एकात्मतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सावरकरांविषयी काँग्रेसकडून अनेकदा केले गेलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्यावरून पुन्हा एकदा निर्माण झालेला वाद, यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हं आहेत. आता या वक्तव्यावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

error: Content is protected !!