दाहशतवाद्यांना अद्दल घडवा, मनसे सरकारच्या पाठीशी

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या भ्याड हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांना मनसेकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या हल्ल्याला अत्यंत गंभीर घटना म्हणत, केंद्र सरकारच्या कठोर कारवाईला पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी इस्रायलच्या पद्धतीचा उल्लेख करत म्हटलं की, “१९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकमध्ये पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी इस्रायली खेळाडूंवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने कडक कारवाई केली होती. भारतानेही तसंच ठाम पाऊल उचलायला हवं.”

हल्लेखोरांनी गोळ्या झाडतानाही धर्म विचारल्याच्या कथनाचा उल्लेख करत, ठाकरे म्हणाले, “हे केवळ दहशत नव्हे तर धार्मिक तेढ वाढवण्याचाही प्रयत्न आहे. अशा वेळी आम्ही सर्व हिंदू एकत्र येऊन प्रत्युत्तर देऊ.”

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर परिस्थिती स्थिर होताना दिसत असतानाच अशा हल्ल्यामुळे भविष्यातील गुंतवणूक, पर्यटन आणि उद्योगांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, असा इशाराही त्यांनी दिला.

“सरकारने आता एकदाच ठोस आणि निर्णायक कारवाई करावी. बाकीच्यांचं माहित नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारच्या पूर्णपणे सोबत असेल,” असं म्हणत ठाकरे यांनी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कायमचा संपवण्याची मागणी केली आहे.

error: Content is protected !!