नाशिक – केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू संसदीय समितीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे शनिवारी पेट्रोलियम क्षेत्रातील संघटनांशी विचार विनिमयासाठी बैठक पार पडली. दुपारी चार वाजता झालेल्या या बैठकीत नाशिकमधील सीएनजी पुरवठयासंदर्भात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या बैठकीला माजी खासदार आनंद परांजपे, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पगार, तसेच एलपीजी वितरक संघटना, नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशन, व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत फामपेडा सचिव सुदर्शन पाटील यांनी ट्रान्सपोर्ट टेंडर प्रक्रियेसाठी संपूर्ण राज्यभर एकसंध धोरण असावे, अशी मागणी केली. तसेच, बायोडिझेलच्या अवैध विक्रीचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. फामपेडा समन्वयक व जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यात सीएनजी पुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे ग्राहकांना व वितरकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब मांडली.
सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकत तटकरे यांनी याबाबत केंद्र सरकारच्या समितीमध्ये चर्चा होईल असे आश्वासन दिले. तसेच, जुलै २०२५ मध्ये होणार्या समितीच्या बैठकीसाठी सर्व समस्या व सूचना निवेदनाच्या स्वरूपात आधीच सादर करण्याचे आवाहन त्यांनी संबंधित प्रतिनिधींना केले. या निवेदनांवर कार्यवाही करून विषयपत्रिकेत समावेश करण्याचे आणि योग्य निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
बैठकीस उपाध्यक्ष दिनेश धात्रक, सचिव राजेश पाटील, अमोल बनकर, मनोज चांडक, हेमचंद्र मोरे, रोहित वैशंपायन, मुकुंद आढाव, आबा बोराडे, राजेंद्र चव्हाणके यांसह विविध प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.










