नाशिक । नाशिक हे पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि निसर्गाने समृद्ध असे शहर आहे. सुवर्ण त्रिकोणातील महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे देश-विदेशातून येथे आकर्षण निर्माण झाले आहे. या संपत्तीचे जतन करणे व त्याला नवे आयाम देणे ही जबाबदारी सर्व नागरिकांची आहे, असे मत नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले.

ठक्कर डोम येथे सुरू असलेल्या प्रॉपर्टी एक्स्पो दरम्यान आयोजित “ग्रीन कुंभ संकल्प २५” या तीन दिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते. बांधकाम क्षेत्राने विकास साधताना पर्यावरणाला बाधा न आणता सजगतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पुढे ते म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्यांची जपणूक झाली पाहिजे आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातून नाशिक शहराचा नकारात्मक संदेश बाहेर जाऊ नये यासाठी सर्वांनी सजग राहणे आवश्यक आहे.
या चर्चासत्रात आयपीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरमित सिंग अरोरा यांनी हरित जीवनशैलीचे महत्त्व सांगताना पंचमहाभूतांचे रक्षण करणे हेच आपले प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात स्मार्ट सिटी प्रकल्पातील अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद तसेच अनेक मान्यवर सहभागी झाले.
पर्यावरणपूरक कुंभमेळा या विषयावर सोमवार दि. १८ रोजी तज्ज्ञ अजित गोखले मार्गदर्शन करणार आहेत. स्वच्छ हवा, पाणी व माती यासाठी परवडणार्या उपाययोजनांची माहिती दिली जाणार असून बांधकाम क्षेत्रातील पर्यावरण रक्षणाबाबत ममता रावत मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्राचे समन्वयन वास्तुविशारद प्राचार्या प्राजक्ता बस्ते करतील.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले असून, नाशिकच्या हरित विकासाचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयपीए माजी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद शेटे यांच्यासह अनिता बोराडे, राज हिरे, अनिल आरगडे, आनंद दीक्षित, सुनील कोतवाल, अनिकेत चौधरी, तेज टाकळे, शामकुमार साबळे, निरंजन शाह विशेष परिश्रमघेतआहेत.











