नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघातील तिरंगी लढतीत महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांनी मोठा विजय मिळवत समीर भुजबळ यांचा पराभव केला. यानंतर समीर भुजबळ यांनी आपल्या राजीनाम्याबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. “मी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजीनामा दिला होता, मात्र तो अद्याप स्वीकारलेला नाही,” असा दावा समीर भुजबळ यांनी केला.
या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी समीर भुजबळांवर जोरदार टीका केली. “समीर भुजबळ हा अजित पवारांकडून हुसकलेला माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा आधीच स्वीकारला होता. महायुतीविरोधात काम करणाऱ्यांची हकालपट्टी होणार, हे आधीच ठरले होते,” असे कांदे म्हणाले.
तसेच, कांदे यांनी भुजबळ यांच्यावर वैयक्तिक टीका करताना म्हटले, “ईडी, सीबीआय यांच्यापासून वाचण्यासाठी समीर भुजबळ अजित पवारांच्या पुढे-पुढे करत आहेत. एखाद्या प्राण्याला हुसकल्यावर तो पुन्हा-पुन्हा येतो, तसे भुजबळांचं झालंय. महायुतीला सत्ता मिळाली, पण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. माजी खासदार समीर भुजबळ यांची मला कीव येते. भुजबळ साहेबांचं वय झालं आहे, त्यांना आता विश्रांती द्या.”
दरम्यान, समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले की, “मी पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो आहे. नांदगावमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागला म्हणून मी निवडणूक लढवली. आता पक्षाने मला कुठली जबाबदारी द्यायची, हे त्यांचं ठरवायचं आहे.”
नांदगावच्या राजकारणात रंगलेली ही शब्दांची लढाई आगामी घडामोडींना कोणता कल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










