मुंबई । नाशिकमधील शिवसेनेचे माजी नेते सुधाकर बडगुजर यांनी अखेर भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला असून, यानंतर त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) वर थेट निशाणा साधला आहे. “महापालिका निवडणुकीत दूध का दूध, पानी का पानी होईल,” असा इशारा त्यांनी दिला.
शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर बडगुजर यांचा भाजप प्रवेश काहीसा वादग्रस्त ठरला होता. भाजपमध्ये प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे, बडगुजर यांनी बावनकुळे यांचे मकाऊतील कसिनो बारमधील फोटो खासदार संजय राऊत यांच्याकडे दिल्याचा आरोप झाल्याने हे प्रकरण अधिक गाजले.
मात्र, भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सगळा वाद निवळला आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत बडगुजर यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी बडगुजर म्हणाले, “बावनकुळे साहेबांचा प्रत्येक आदेश पाळेन, निष्ठेने काम करेन. कोरोना काळातील आपल्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला. मी निष्पाप आहे. कोरोना काळात मी काम केलं, जेव्हा कोणी बाहेर नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही स्तुती केली. महाराष्ट्रातील पहिला सांडपाण्यातून वीज निर्मिती प्रकल्प त्यांनी दिला. ते दूरदृष्टीचे नेते आहेत, असं त्यांनी म्हटलं.
मनभेत नाहीत मतभेद
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मनभेद नाकारत मतभेद असल्याचं मान्य केलं. सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट होईल, असं ते म्हणाले. बडगुजर यांच्या प्रवेशामुळे नाशिक आणि परिसरातील राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या तयारीला यामुळे नवे बळ मिळणार, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.










