नाशिक । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानंतर नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षाकडून झालेल्या कारवाईनंतर सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
मी पक्षाच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहिलो कारण मी नियोजित दौर्यावर होतो. मी माझी गैरहजेरी पक्षाला आधीच कळवली होती. मात्र तरीही माझ्यावर कारवाई झाली, जी अयोग्य आहे, असे बडगुजर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे जर पक्षातून हकालपट्टी होत असेल, तर हा सरळसरळ अन्याय आहे, अशी टीका करत त्यांनी थेट शिवसेना नेतृत्वालाच आव्हान दिले.
मी मुख्यमंत्र्यांना नागरिकांच्या प्रश्नांसाठी भेटलो.
शिवसेना संघटनेविरोधात एकही काम केले असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे, असा दावा करत त्यांनी संजय राऊत यांच्याशी झालेली मोबाईलवरची संभाषणं पत्रकार परिषदेत दाखवली.
गिरीश महाजन यांच्यासोबत फोटो होता म्हणून विचारणा झाली, पण अरविंद सावंत तेव्हा सोबत होतेच ना? मग फक्त माझ्यावरच कारवाई का? असा खोचक सवालही त्यांनी केला.
दरम्यान, त्यांच्या नाशिक येथील संपर्क कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी झाली होती. सुधाकर बडगुजर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे समर्थकांनी सांगितले.
पक्षात खरे बोलणे जर गुन्हा असेल, तर तो मी केलाय, असे स्पष्ट शब्दात सांगत त्यांनी पक्षातील अंतर्गत नाराजी आणि दुजाभावाच्या मुद्द्यावर बोट ठेवले. शिवसेना जिल्ह्यात बडगुजर यांनी मोठे संघटनात्मक काम केले असून, अशा प्रकारे एकतर्फी निर्णय घेणे चुकीचे असल्याचे मतही समर्थकांनी व्यक्त केले. आता बडगुजर भाजपकडे वळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.







